“ग्रहण हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ असतो; गरोदर महिलेला ग्रहण पाळण्याची सक्ती करू नका” – अंनिस

पुणे – ऐन दिवाळीत 25 ऑक्‍टोबर ला सायं. 4. 50वाजता खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. यावेळी 36 टक्के सूर्य झाकला जाणार आहे. ग्रहण हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी च्या सावल्याचा खेळ असतो. यावेळी ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण’ ही अंनिसने प्रबोधन मोहिम सुरु केली आहे. यामध्ये सांगली मिरज स्रीरोग तज्ञ संघटना ही सहभागी झाली आहे.

या दोन्ही संघटनांनी काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सूर्यग्रहण सारख्या एका सुंदर खगोलीय घटनेला अशुभ मानने चूक आहे. ग्रहण काळात कोणतेही हानिकारक किरणे निघत नाहीत ,अन्न पाणी दुषित होत नाही अशी जनजागृती या मोहीमे द्वारे केली जात आहे.

समितीकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार, ग्रहण काळात गरोदर मातेला एका जागी अंधाऱ्या खोलीत बसवतात हे तिच्या व बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकते. ग्रहण काळात गरोदर मातेने काम केलेस बाळाचे ओठ फाटतात याला काहीही वैद्यकीय आधार नाही. मानवी गर्भाचा विकास 8 व्या आठवड्यापर्यंत पूर्ण झालेला असतो व त्यासाठी क्रोमोसोम्स व त्यावरील जनुके जबाबदार असतात. गर्भाचे व्यंग हे अनुवंशिकतेने किंवा नव्या म्युटेशन्समुळे होणाऱ्या जनुकीय वा गुणसूत्रांच्या दोषांमुळे किंवा पहिल्या 2 महिन्यात कांही औषधे खाल्ल्याने, तसेच फॉलेट व व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तयार होतात.

तिसऱ्या व पाचव्या महिन्यातील सोनोग्राफीमध्ये डॉक्‍टरांना काही दोष दिसले नसल्यास काहीच घाबरण्याचे कारण नाही. ग्रहणामुळे बाळाला व्यंग निर्माण होत नाही, वैज्ञानिक दृष्टीकोनातून गरोदर मातेला ग्रहण पाळायला लावू नका असे आवाहन अंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष आणि स्रीरोग तज्ञ डॉ. संजय निटवे, अंनिस चे राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल थोरात आणि सांगली मिरज स्रीरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मोनिका कल्लोळी, सेक्रेटरी डॉ. कांचन जोशी यांनी केले आहे.
.