न्यायप्रविष्ट असलेल्या विषयात राजकारण करणे हे आपली अप्रगल्भता दर्शवते – जितेंद्र आव्हाड

मुंबई – राज्यात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रोश मोर्चा काढण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले. न्यायप्रविष्ट असलेल्या विषयात राजकारण करणे हे आपली अप्रगल्भता दर्शवते, असे प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी केले.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात नाही. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असणार आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण मुख्यमंत्र्यांच्या हातात असते तर मी त्यांच्या टेबलासमोर ठाण मांडून ते पदरात पाडून घेतले असते, असा दावा मंत्री आव्हाड यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, प्रगल्भता असेल तर ओबीसी आरक्षण हा विषय न्यायप्रविष्ट आहे मान्य करावे लागेल. राज्य सरकार बांठीया आयोगाच्या माध्यमातून हे आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राज्याच्या बाजूने लागून आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.