डॉल्बी सिस्टिमला बंदी

सातारा  -गणेशोत्सवादरम्यान दि. 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिम वापरास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून गतवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉल्बीला बंदी घालण्यात आली आहे.

गणेशोत्सवादरम्यान प्रशासनाने डॉल्बी वापरास परवानगी द्यावी, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली होती. डॉल्बी चालक संघटनेच्यावतीनेही प्रशासनाला विनंती करण्यात आली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्ह्यामध्ये दि. 31 ऑगस्टच्या सकाळी 7 वाजल्यापासून ते दि. 10 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत डॉल्बी मालक, धारक, गणेश मंडळांचे पदाधिकारी यांना त्याच्या कब्जातील डॉल्बी सिस्टिीम वापरात, उपयोगात आणू नये. डॉल्बी मशिन व त्यासंबंधीची यंत्रसामुग्री स्वत:च्या कब्जात सीलबंद स्थितीत ठेवावी, असे प्रतिबंध आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे जारी केले आहेत.