नवरात्रोत्सवात तुळजाभवानीच्या चरणी कोट्यवधींचे दान; सोने-चांदीही अर्पण

सोलापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत नवरात्र महोत्सवाच्या काळात भरभरून देणगी जमा झाली आहे. नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक तुळजाभवानीच्या दर्शनाला येतात. या कालावधीत तब्बल पावणे चार कोटी रूपयांची देणगी तुळजाभवानी मंदिर संस्थानला प्राप्त झाली आहे. याशिवाय भाविकांनी श्रध्देने सोने आणि चांदी देखील मोठ्या प्रमाणात देवीचरणी अर्पण केले  आहे.

मागील वर्षीपासून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या वाढत आहे. यंदाही देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नवरात्र कालावधीत पेड दर्शन घेणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय होती. जवळपास तीन लाख ७३ हजार २४७ भाविकांनी तुळजाभवानी मंदिर समितीकडे अधिकृतपणे पैसे जमा करून देणगी दर्शन घेतले. त्यातून तुळजाभवानी मंदिर संस्थानला एक कोटी ९३ लाख ६६ हजार ४६२ रूपये रोख स्वरूपात प्राप्त झाले.

याशिवाय तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रध्देने दानपेटीमध्ये तब्बल एक कोटी ५७ लाख ४२ हजार ७३० रूपयांची रोकड अर्पण केली आहे. तसेच वेगवेगळ्या धार्मिक विधीतून देखील मोठ्या संख्येने भाविकांकडून रक्कम प्राप्त झाली आहे. या नऊ दिवसात तीन लाख ७३ हजार २४७ भाविकांनी तुळजाभवानी मंदिर समितीकडे अधिकृतपणे पैसे जमा करून देणगी दर्शन घेतले.

वेगवेगळ्या धार्मिक विधीतून नवरात्र काळात २२ लाख ३९ हजार ५७७ रूपये इतका महसूल तुळजाभवानी मंदिर समितीला प्राप्त झाला आहे. देणगी दर्शन, दानपेटी आणि इतर माध्यमातून मिळालेली ही सर्व रक्कम तीन कोटी ७३ लाख ४८ हजार ६७९ रूपये इतकी आहे. याशिवाय तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी ७३६ ग्रॅम सोने आणि ११ किलो ९५४ ग्रॅम चांदी अर्पण करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा देवीच्या चरणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान करण्यात आले आहे.