कोहलीला काही काळ विश्रांतीची गरज – शास्त्री

मुंबई  – भारतीय संघ सातत्याने खेळत आहे. एक मालिका संपली की लगेच दुसरी मालिका असते. खेळाडूंना विश्रांतीच मिळत नाही, हे मी स्वतः मुख्य प्रशिक्षक असतानाही अनुभवले आहे. तेच दडपण विराट कोहलीवरही आले आहे. त्यालाही आता विश्रांतीची गरज आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो मानसिकरीत्या थकलेला दिसत आहे, असे परखड मत माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी व्यक्‍त केले आहे.

2019 साली बांगलादेशविरुद्धच्या शतकी खेळीनंतर कोहलीच्या बॅटमधून मोठी खेळी झालेली नाही. अर्थात त्याने या काळात काही अर्धशतकी तसेच 30-40 धावांच्या खेळी केल्या. मात्र, यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याच्या अपयशापेक्षा ज्या पद्धतीने तो बाद होत आहे ते पाहून जास्त त्रास होत आहे. अशा बेजबाबदार पद्धतीने तो यापूर्वी कधीच बाद होत नव्हता. त्याची देहबोलीही नकारात्मक असल्याचे दिसते. सातत्याने खेळल्याचाच हा परिणाम आहे. बीसीसीआयने त्याच्यासह अनेक खेळाडूंवर सातत्याने मालिका खेळण्याची सक्‍ती केली आहे हे स्पष्टच होत आहे, असेही ते म्हणाले.

कोहली सातत्याने मालिका खेळत आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या बायोबबल आवश्‍यक आहे. पण त्यामुळे खेळाडूंचा बाह्यजगाशी संपर्क तुटला आहे. कोहली मानसिकरीत्या थकला आहे. कोहलीला जर पुढील काळात यश मिळवायचे असेल तर त्याला काही काळ विश्रांतीची गरज आहे. कोहली सध्या बॅड पॅचमधून जात आहे. त्याच्या कारकिर्दीची अजून 6 ते 7 वर्षे निश्‍चितच बाकी आहेत. त्यामुळे कोहलीला विश्रांती देण्याबाबत बीसीसीआयने गांभीर्याने विचार केला पाहिजे.

प्रत्येकाबद्दल सहानुभूती हवी

मी जेव्हा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होतो त्यावेळी मी प्रत्येक खेळाडूकडे सहानुभूतीने पाहिले. खेळाडूंवर खेळण्याची सक्ती केली गेली तर त्यांच्या कारकिर्दीला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे यावर काहीतरी उपाय शोधला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.