निळवंडेबाबत काळजी करू नका : थोरात

संगमनेर – निळवंडे धरण अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले असून, कालव्यासाठी मोठा निधी मिळवला. रात्रंदिवस कामे सुरू ठेवली होती. ऑक्‍टोबर 2022 मध्येच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी द्यायचे होते. परंतु सरकार बदलले आणि काम मंदावले. परंतु पाणी येणार आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे आ. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022- 23 गळीत हंगाम सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते. व्यासपीठावर माजी आ. डॉ सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, कांचन थोरात, दुर्गाताई तांबे, बाजीराव पा.खेमनर, रणजितसिंह देशमुख, लहानुभाऊ गुंजाळ, आर. बी. राहणे, मिलिंद कानवडे, सोमेश्‍वर दिवटे, उपाध्यक्ष संतोष हासे, इंद्रजित थोरात, गणपतराव सांगळे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, सुनंदा जोर्वेकर, निर्मला राऊत, नवनाथ आरगडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. आ. थोरात म्हणाले की, कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे असून, सहकारी संस्था, कारखाना यामुळे तालुक्‍यातील आर्थिक समृद्धीसह प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आ. डॉ. तांबे म्हणाले की, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करताना शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.आ. सत्यजित तांबे यांनी, उपपदार्थनिर्मिती बरोबर आगामी काळात इथेनॉलनिर्मितीमध्ये साखर कारखान्याला मोठी संधी असल्याचे सांगितले.
ओहोळ म्हणाले की, तालुका विकासात पुढे असून, काही विघ्नसंतोषी त्यामध्ये अडथळे निर्माण करू पाहत आहे. त्यांना जनताच उत्तर देईल. या वेळी संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजित खेमनर, संपतराव गोडगे, अभिजित ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे ,माणिक यादव, मंदा वाघ, रामदास वाघ, संभाजी वाघचौरे, मीरा शेटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

वेतन फरक 4 कोटी 21 लाख
थोरात कारखान्याने सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक यांच्याबरोबर कामगारांचे हित जोपासताना अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेतले असून, वेतन फरक 4 कोटी 21 लाख रुपये देण्याचा निर्णय आ. बाळासाहेब थोरात यांनी जाहीर करताच कामगारांनी टाळ्यांचा कडकडाट केला.