डॉ. दाभोलकर प्रकरण : तपास यंत्रणांकडून पिस्तुलांचा गोंधळ?

पुणे – “अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुणे पोलीस व सीबीआयने केलेल्या तपासात चार पिस्तूलांचा गोंधळ दिसून येत आहे. तसेच सीबीआयच्या दोन दोषारोपपत्रात विरोधाभास आहे,’ असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी सत्र न्यायाधीश आर.एम.पांडे यांचे न्यायालयात केला. ऍड.संजीव पुनाळेकर यांनी आरोपींना शस्त्र नष्ट करण्यास सल्ला दिल्याचा ठपका ठेवत त्यांना अटक केल्याने, पुनाळेकर यांचे जामीन अर्जावर युक्तिवाद करताना इचलकरंजीकर यांनी भूमिका मांडली आहे.

युक्तिवादादरम्यान इचलकरंजीकर म्हणाले, “दाभोलकर प्रकरणातील एक पिस्तूल, कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरणातील दोन पिस्तूल व साहित्यिक कलबुर्गी प्रकरणातील एक पिस्तूल यामध्ये साधर्म्य असल्याचे फॉरेन्सिक अहवालाचे आधारे तपास यंत्रणेने न्यायालयात सांगितले. मात्र, दाभोलकर प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याने ठाण्याचे खाडीत पिस्तूल टाकल्याचा दावा सीबीआय करत आहे, ते अद्याप मिळून आलेले नाही किंवा ते शोधण्याचा त्यांनी प्रयत्न ही केला नाही.

डॉ. दाभोलकर प्रकरणात सुरुवातीला पुणे पोलिसांनी मनीष नागोरी व विकास खंडेलवाल यांनी खून केल्याचे सांगत त्यांच्याकडून एक पिस्तूल जप्त केले. त्यानंतर सदर पिस्तूल मुंबईतील कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून त्याचा अहवालानुसार सदर पिस्तूलानेच खून झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी नागोरी व खंडेलवाल यांच्याविरोधात 90 दिवसांत दोषारापेपत्र दाखल न केल्याने त्यांची सुटका झाली. त्यानंतर सीबीआयकडे याप्रकरणाचा तपास हस्तांतरित करण्यात आला. तपास यंत्रणांनी फरार असलेले साधक सारंग अकोलकर व विनय शिंदे यांनी हत्या केल्याचे सप्टेंबर 2016 मध्ये न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात नमूद केले. तसेच अकोलकर व शिंदे यांना फोटोवरुन ओळखल्याचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तपास यंत्रणांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोन दोषारोपपत्रात विरोधाभास दिसत असून चुकीच्या पद्धतीने तपास करणाऱ्या पोलिसांवर कोणती कारवाई झालेली नाही.

दाभोलकरप्रकरणात नेमका कोणत्या पिस्तूलाचा वापर करण्यात आले, हेदेखील अद्याप स्पष्ट झाले नाही. कळसकर याचा जबाब सात महिन्यापूर्वी सीबीआयने नोंदवला, पण त्यानंतर अद्याप दुसरा कोणताही पुरावा पुनाळेकर यांच्या विरोधात मिळून आलेला नाही. पुनाळेकर यांनी कोणत्याही प्रकारचा संगनमताने कट रचलेला नसताना त्यांचेवर बेकायदेशीर हालचाल प्रतिबंधका कायद्यानुसार (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’

दरम्यान, याप्रकरणी सीबीआयचे वतीने दि.17 जून रोजी म्हणणे मांडण्यात येणार असून त्यानंतर न्यायालय पुनाळेकर यांचे जामिनावर निर्णय देईल.

Leave a Comment