पुणे | पुणे मनपा आयुक्तपदी डाॅ. राजेंद्र भोसले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखेर महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयुक्त म्हणून डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. डाॅ, भोसले हे सध्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी होते. यापूर्वी त्यांनी अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हाधिकारी, तसेच सोलापूर जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर विक्रम कुमार यांच्याकडे आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) जबाबदारी दिली आहे.

विक्रम कुमार यांची १२ जुलै २०२० रोजी महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्याआधी ते पीएमआरडीए आयुक्त होते. गेल्या ३ वर्षे आठ महिन्यांपासून त्यांच्याकडे महापालिकेची जबाबदारी होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकांआधी निवडणूक आयोगाने राज्यातील ३ वर्षे पूर्ण झालेल्या तसेच संबंधित लोकसभा निवडणूकीच्या कामात थेट सहभाग असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना शासनास केल्या होत्या.

मात्र, त्यानंतरही शासनाकडून अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यात विक्रम कुमार यांचाही समावेश होता. तर कुमार यांना वैयक्तिक कारणास्तव मे २०२४ अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, लोकसभा निवडणूकानंतर त्यांची बदली होणार असल्याचे सांगितले जात होते. पण, काही दिवसांपूर्वीच डाॅ. भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. सन २००८ मध्ये डाॅ. राजेंद्र भोसले यांचा भारतीय प्रशासकीय सेवेत समावेश करण्यात आला.

दोन वर्षे राहिले प्रशासक
विक्रम कुमार यांनी दोन वर्षे महापालिकेच्या प्रशासकपदाची जबाबदारी सांभाळली. या कार्यकाळात त्यांनी समान पाणीपुरवठा योजना, मेट्रो, नदीकाठ विकसन प्रकल्प, जायका प्रकल्प, १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत महापालिकेस मोठ्या प्रमाणात अनुदान मिळाले. तर १४ मार्च २०२२ मध्ये महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर ते मागील दोन वर्षे प्रशासक म्हणून पालिकेची जबाबदारी सांभाळत होते.