पुणे | नालेसफाईचा यंदाही बोजवारा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नालेसफाईची कामे मागील वर्षी उशीरा सुरू झाल्याने नाले सफाईचा उडालेला बोजवारा आणि यावर्षी लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत महापालिका प्रशासनाकडून मार्च महिन्यातच नालेसफाईच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या निविदा मंजूर करत कार्यादेश देण्यात आले.

मात्र, त्यानंतरही या कामाला गती मिळालेली नाही. परिणामी, यंदाही पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता स्वत: अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. हे स्वत: दि. १५ एप्रिलपासून नालेसफाई कामांची पाहणी करणार आहेत. महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारांना १५ मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कामांना अपेक्षीत गती नाही…
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही महापालिकेच्या नालेसफाईच्या निविदा ४७ टक्के पर्यंत कमी दराने आलेल्या आहेत. त्यामुळे, ठेकेदरांना या पैशात कामे परवडत नसतानाही ते निविदा मिळवित असल्याने प्रत्यक्षात काम न करताच कागदावर दाखविले जाते.

त्यातच, या वर्षी महापालिकेचे अधिकारी बदलले असल्याने प्रत्यक्षात या कामावर कोणत्याही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. त्यातच पालिकेचे अनेक कर्मचारी निवडणूक कामात असल्याने या कामाची पहाणी करण्यासाठी पुरेसे कर्मचारीही नाहीत ही बाब लक्षात घेता नालेसफाईच्या कामांना अद्याप गती आलेली नाही. त्यातच शहरातील अनेक भागात नालेसफाई झाली नसल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे येत आहे.

सोमवारपासून शहरातील नालेसफाई कामांची पाहणी करणार आहे. परिमंडळनिहाय आढावा घेतला जाणार आहे, त्यासाठीची ठिकाणे तसेच परिमंडळ निहाय माहितीचा आढावा घेण्यात आला असून परिमंडळ उपायुक्तांनाही याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. – पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त