नालेसफाईवर जीपीएस यंत्रणेद्वारे लक्ष ठेवणार

पावसाळापूर्व कामे सुरू : महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे – शहरातील नाले सफाईच्या कामात गैरव्यवहार होत असल्याची टीका कायमच होत असते. ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. या कामांवर आता एकाच ठिकाणाहून जीपीएस यंत्रणेद्वारे लक्ष ठेवण्यात येनार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता महापालिका प्रशासनाने नाले सफाईचे काम हाती घेतली आहेत. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. ही कामे वेळेत करायची असल्यामुळे तयारी पूर्ण झाली आहे.

मागील वर्षी अंबिल ओढ्याला आलेल्या पुराची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने आत्तापासूनच कामाला सुरूवात केली आहे. यामध्ये शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई, पावसाळी वाहिन्या-चेंबर साफ करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. दरवर्षी एप्रिलमध्ये ही कामे सुरू करण्यात येतात.
पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी 45 दिवस लागतात. महापालिका प्रशासनाने यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यानुसारच नालेसफाई आणि इतर कामे करण्यात येणार आहेत.

महापालिका ठेकदाराला नाले सफाईसाठी घनमीटरप्रमाणे पैसे दिले जातात. यामध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप अनेकदा होतो. त्यामुळे यावर जीपीएस यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी एका खासगी संस्थेची मदत महापालिका प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.

“प्रायमुव्ह’ या संस्थेने शहरातील नाले आणि भविष्यातील पुराचा अहवाल तयार केला आहे. संपूर्ण साफसफाईची कामे क्षेत्रीय कार्यालयाऐवजी मुख्य खात्याकडून करण्यात येणार आहेत. कार्यालयांऐवजी मुख्य गटार विभाग करणार आहेत.

अंबिल ओढ्याला संरक्षक भिंत
पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी मर्यादित वेळ आहे. सध्या आम्ही प्राधान्याने अंबिल ओढ्याचे काम हाती घेतले आहे. मागील वर्षी अंबिल ओढ्याला मोठ्याप्रमाणात पूर आला. त्यामुळे कात्रज येथील दोन्ही तलावांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या तलावांची पातळीदेखील कमी करण्यात येणार आहे. अंबिल ओढ्याची संरक्षकभिंत तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Comment