बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट

बेल्हे बाजारात साज खरेदीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

अणे – बेल्हे (ता. जुन्नर) येथे सोमवारी भरणारी बाजारपेठ जनावरांच्या साज सामानाने सजली होती. यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्याने बाजारात काहीशी मंदी दिसून आली. शनिवारी भाद्रपद अमावस्येला होणाऱ्या बैलपोळ्यासाठी येथे म्हणावी तशी गर्दी झालीच नाही.

भाद्रपद अमावस्येला येणाऱ्या बैलजोडी सजवण्यासाठी शेतकरी हजारो रुपये खर्च करतात. यावर्षी साहित्य खरेदी अल्प प्रमाणात झाली. दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी बैलांची विक्री केली होती. बैलांचे प्रमाणही जुन्नर तालुक्‍यात कमी झाले आहे. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलाशी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पोळा सणानिमित्त बेल्हे बाजारात घुंगरू, झालर, दोरी, नाथे, कवळी, रंग, हिंगुळ सर, बेगड, मातीचे बैल, घोगरमाळ, मोरखी या वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या होत्या. ग्रामीण भागात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त येथील बाजारपेठेत सजावटीच्या विविध वस्तू दिसत होत्या; परंतु ग्राहक खरेदी करताना दिसत नसल्याने बाजारात शुकशुकाटच होता.

यावर्षी दुष्काळामुळे ग्राहक कमी आहे.पूर्वी सारखा पोळा दिवसेंदिवस साजरा होत नाही.बैलगाडा बंदी असल्याने बैलांचा प्रमाण ही कमी झालं आहे तसेच शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळल्याने बैलांचा प्रमाण घटल आहे.त्याचा परिणाम साज खरेदीवर होत आहे.
– शाहरुक तांबोळी, साज विक्रेते

Leave a Comment