पुरंदर तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा ; तहसीलदार यांना आपचे निवेदन

सासवड – पुरंदर तालुक्‍यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये खरीप हंगाम संपत आला तरी देखील पावसाने पाठ फिरवली आहे. संपूर्ण तालुक्‍यावर दुष्काळाचे गडद सावट आहे. अवघ्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न देखील बिकट होऊन चारा छावण्या चालू कराव्या लागतील, अशी भीषण परिस्थिती आहे. त्यातही सप्टेंबरमध्ये हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजा प्रमाणे पावसाची शक्‍यता धूसर होत आहे. त्यामुळे पुरंदर तालुका हा दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा, अशी मागणी पुरंदर तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली.

आम आदमी पार्टीचा वतीने तहसीलदार विक्रम राजपूत व गट विकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांना निवेदन देऊन पुरंदर तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, ही मागणी करण्यात आली.

खरीप हंगाम जवळपास हातचा गेल्यामुळे जळालेल्या, करपलेल्या पिकांचे पंचनामे करून खरीप नुकसानभरपाई, रब्बीसाठी मोफत बी- बियाणे, चारा छावण्या, पशूधनाची मोफत आरोग्य तपासणी व उपचार भूजल साठे सर्वेक्षण, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे टॅंकरचे नियोजन करावे. कर्ज वसुली थांबवावी, कर्जाचे व्याज माफ करावे, कृषी वीजबिल माफ करावे व विद्यार्थ्यांना मोफत एसटीचे पास द्यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी आप पुरंदर तालुकाध्यक्ष दत्तात्रय कड, राजन पवार, महेश जेधे सचिन गायकवाड, शहाजी कोलते, अमोल जगताप, संदीप चौंडकर, अमोल कड, ओंकार अडसूळ, प्रभाकर मुळीक, निखिल पवार, सुशील पवार, प्रशांत कोलते, संपत भुजबळ, राजू शेख, अनिल कोलते आदी उपस्थित होते.