डीएसके प्रकरण : डीएसकेच्या 100हून अधिक ठेवीदारांचा मृत्यू

विजयकुमार कुलकर्णी

पुणे – ठेवींवर चांगला परतावा मिळतोय म्हणून आयुष्याची पुंजी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याकडे गुंतवणारे ठेवीदार आता आपले पैसे मिळावेत म्हणून जिवाचा आकांत करत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे राज्यभरातील सुमारे 100 हून अधिक ठेवीदारांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे.

तर गुंतवणूकदारातील अनेक जण ज्येष्ठ आहेत. सेवानिवृत्तीतून मिळालेले पैसे त्यांनी गुंतवले आहेत. कोणतीही चूक नसताना उतारवयात त्याच्यावर आपल्या हक्काच्या पैशांसाठी न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली आहे. मृत्यू झालेल्या काही जणांची नावे माहिती आहेत. काही ठेवीदार या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयातदेखील हजर राहत होते, तर काही लोकांची नावे महिती नाहीत.

ज्येष्ठ गुंतवणूकदारांची आता आजारपण, मुला-मुलीचे लग्न, घराचे बांधकाम अशा विविध कारणांसाठी त्वरित पैसे मिळावे म्हणून अनेकांची न्यायालयीन लढाई सुरूच आहे. या प्रकरणात डीएसके, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई, मेव्हणी यांच्यासह काही नातेवाईकांना अटक झाली आहे. आता तर डीएसके, हेमंती यांच्यासह अनेकांचा जामीन झाला आहे.

बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यातून बॅंकेच्या अधिकाऱ्यांना या गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे. डीएसके यांनी 35 हजार गुंतवणूकदार आणि बॅंकांची सुमारे 3 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुंतवणूकदारांची 1 हजार 163 रुपयांची फसवणूक झाली आहे.

पैसे मिळण्यासाठी उतारवयात जिवाचा आकांत

तब्बल 35 हजार गुंतवणूकदारांची 1163 कोटी रुपयांची फसवणूक

गुंतवणूकदारांचे वकील ऍड. चंद्रकांत बिडकर म्हणाले की, डीएसके प्रकरण लवकर निकाली लागून पैसे मिळावे, अशी आमची इच्छा आहे. गुंतवणूकदारांमध्ये 75 टक्‍क्‍यांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. काही ठेवीदारांकडे आता आजारपणाला देखील पैसे नाहीत, अशी स्थिती आहे. आतापर्यंत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत उच्च न्यायालयात माहिती दिली आहे. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची भेट घेऊन लवकरात लवकर प्रश्‍न सोडविण्यासाठी मार्ग काढण्याची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

एका व्यक्तीने केली आहे आत्महत्या

मुलीच्या लग्नासाठी डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने तानाजी गणपत कोरके (वय 60) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येसाठी डीएसके यांना जबाबदार ठरवले आहे. कोरके यांनी मुलींच्या मुलांच्या शिक्षणासाठी 50 हजार रुपये डीएसके डेव्हलपर्सकडे गुंतवले होते.