पुणे | डीएसके यांना मिळाली बंगला, कार्यालयात प्रवेशाची परवानगी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बंगल्यात आणि कार्यालयात जाण्यास दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना मुंबई येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंगला आणि कार्यालयात असलेले कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यासाठी डीएसके यांनी याबाबत अर्ज केला होता.

डीएसके यांचा सेनापती बापट रस्त्यावर “सप्तश्रृंगी’ नावाचा बंगला आहे. तर डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे जंगली महाराज रस्त्यावर कार्यालय आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने या दोन्ही मालमत्ता जप्त केलेल्या आहेत. “या दोन्ही ठिकाणी माझे अनेक कागदपत्रे आहेत.

त्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील आहेत. ज्यांच्या उपयोग माझ्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये माझी बाजू मांडण्यासाठी होवू शकतो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जाऊन कागदपत्रे आणि उपकरणे ताब्यात घेण्यास परवानगी मिळावी,’ अशी मागणी करणारा अर्ज डीएसके यांनी या प्रकरणातील विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयात केला होता.

कागदपत्रे घेतल्यानंतर पुन्हा कुलूप
ईडीने पुरेशा कर्मचाऱ्यांसह डीएसके यांचे निवासस्थान आणि कार्यालय उघडावे. डीएसके आणि कुटुंबीयांना त्यात प्रवेश देवून त्यांनी त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करावीत. या सर्व प्रक्रियेचा पंचनामा करून कागदपत्रांच्या योग्य वर्णनासह यादी नोंदवून ठेवावी.

ईडी आणि डीएसके यांनी या आदेशाच्या पूर्ततेचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा. ईडी आणि डीएसके असे दोघेही प्रवेश आणि कागदपत्रे घेतानाचे व्हिडिओ शूटिंग घेऊ शकता. कागदपत्रे घेतल्यानंतर बंगला आणि कार्यालय पुन्हा बंद करण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे.