पुणे जिल्हा | पशुधन घटल्याने शेणखताला भाव

थेऊर, (वार्ताहर) – एप्रिल महिन्यामध्ये उन्हाच्या झळा वाढल्याने पुर्व हवेलीमध्ये पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. गुरांसाठी चारापाणी मुबलक उपलब्ध नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी पशुधनाला बाजार दाखवला आहे. उन्हाळी परिस्थिती, त्यात पशुधन घटल्याने मात्र आता शेणखतालाही सोन्याचा भाव आला आहे.

शेणखत महागल्याने जमिनीचा पोत टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान शेतकर्‍यांसमोर उभे राहिले आहे. शेतकर्‍यांकडील पशुधन पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याने शेतीमध्ये शेणखताचा वापर कमी झाला आहे. परिणामी, रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालवत चालला आहे. रासायनिक खतांचा वाढलेला वापर व उत्पादन वाढण्याची स्पर्धा यामुळे रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांनी माती परीक्षण करून शेत जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करणे व त्यानुसार जमिनीला कोणते घटक आवश्यक आहे तीच मात्रा देण्याची गरज निर्माण झाली आहे. सेंद्रीय शेतीतील पिकांना बाजारभाव जास्त मिळत असल्याने शेतकरी बांधव सेंद्रीय खतांकडे वळू लागला आहे. त्यामुळे शेणखताचे महत्व अधोरेखित झाल्याने शेणखताला चांगलाच भाव आला आहे.

कंपोस्ट खतनिर्मितीची गरज
शेणखत विकत घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. सध्या सर्वसाधारण एकरी आठ ते दहा ब्रास शेणखत वापरणे गरजेचे आहे. शेणखताचा चालू बाजारभाव पाहता हा खर्च सर्वसामान्य शेतकर्‍यांना परवडणारा नाही. शेतकर्‍यांनी उत्पादन खर्च कमी करून शेणखताबरोबर कंपोस्ट खत निर्मिती करण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

रासायनिक खताचे दुष्परिणाम
शेतीमध्ये रासायनिक खतांचा अधिक वापर केल्याने जमिनीचा पोत खराब होतो. पर्यायाने शेतजमीन भविष्यात नापीक होण्याचा धोका संभवतो. पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत जातो. रासायनिक खतामुळे पाण्याचे स्त्रोतही दूषित होतात तसेच जमिनीतील कस टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त जीवाणूंना मारक ठरतात. रासायनिक खतांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.

शेतकर्‍यांनी शेणखत, पालापाचोळा, कंपोस्ट खत व विविध जिवाणू खते याद्वारे सेंद्रिय शेती करण्याची खरी गरज आहे. ऊस पिकाची तोड झाल्यानतंरही पाचट न पेटवता त्याचे विघटन करणे गरजेचे आहे. सेंद्रीय खतांमुळे जमीनीचा पोत सुधारुन कस चांगला राहतो त्यामुळे शेतीलाही पाणीही कमी लागते.

रासायनिक खतांमुळे मानवाच्या आरोग्य जीवनावर भयावह परिणाम होऊ लागले आहेत. विषमुक्त शेती करण्याची काळाची गरज बनली असून सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रीय खताचा वापर करावा, तसेच शेतकरी बांधवांना काही अडचणी व शंका असतील तर त्यांनी तालुका कृषी विभागाशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे. -मारुती साबळे, हवेली तालुका कृषी अधिकारी