satara | कराड उत्तर- दक्षिणमुळे उदयनराजेंचा विजय सुकर

सातारा, (प्रतिनिधी)- आधी काँग्रेसचा व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा गेल्या 72 वर्षांमध्ये बालेकिल्ला राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांनी अटीतटीच्या संघर्षात विजय खेचून आणला आणि साताऱ्यात प्रथमच कमळ फुलले. यामध्ये कराड उत्तर, कराड दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघांचा यापूर्वीपेक्षा मोठा वाटा राहिला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटणमध्ये खासदार उदयनराजे भोसले जरी पिछाडीवर राहिले तरी तब्बल 75 हजार 460 मते मिळाल्याने उदयनराजे यांच्या विजयाला टेकू मिळाला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी मिळण्यापूर्वीच संपूर्ण मतदारसंघात भिरकिट केली. आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील यांनी नकार दिल्यानंतर शरद पवार यांच्या शब्दामुळे शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीमार्फत आखाड्यात उतरण्यास तयारी दर्शवली.

उदयनराजे भोसले केंद्रातील वरिष्ठ तर शशिकांत शिंदे हे राज्यातील वरिष्ठ सभागृहाचे सदस्य होते. दोघांसाठीही ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची आणि राजकीय पुनर्वसनाची होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल उदयनराजे यांच्या मनात होती तर शशिकांत शिंदे यांना 2019 च्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये तसेच जिल्हा बँकेच्या स्थानिक राजकारणामध्ये सातत्याने गेल्या काही वर्षापासून पिछाडीवर राहावे लागले. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात आणि रणनीतीमध्ये ती राजकीय ईर्षा दिसून आली.

मतदारांनीसुद्धा दोन्ही उमेदवारांना राजकीय कौल देताना काही ठराविक मतांचेच अंतर ठेवले. त्यामुळे अत्यंत टोकाचा राजकीय संघर्ष सातारा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक व त्याच्यानंतरच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे कमालीचे पिछाडीवर राहिले होते.

त्या दोन्ही निवडणुकांमध्ये 40 हजार मतांच्या फरकाने उदयनराजे मागे राहिले. मात्र डॉ. अतुल भोसले यांच्या मायक्रो प्लॅनिंगने कराड दक्षिणमध्ये चमत्कार घडवला. कराड दक्षिणमध्ये उदयनराजे यांना निवडून आणण्यात डॉ. अतुल भोसले यांनी सिंहाचा वाटा उचलला.

या मतदारसंघात उदयनराजे यांना 92 हजार 814 तर शशिकांत शिंदे यांना 92 हजार 198 मते मिळाली. मताधिक्य मोठे नसले तरी प्रथमच उदयनराजेंना दक्षिणेत एवढी मते मिळाली. याउलट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील उंडाळकर एकत्र असूनही त्यांचा मताधिक्य पूर्वीसारखे टिकवण्यात कोणताच प्रभाव दिसला नाही.

कराड उत्तरेत मनोज घोरपडे व धैर्यशील कदम या दोघांनी उदयनराजेंच्या विजयासाठी घेतलेले कष्ट उपयोगाला आले. उत्तरेत उदयनराजेंना 88930 तर शशिकांत शिंदे यांना ९०६५४ मते मिळाली. शिंदे यांना येथे 1724 अत्यल्प मतांची आघाडी मिळाली.

म्हणजेच कराड उत्तरमध्ये भाजपची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे. ही आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात असून आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना वेगळी रणनीती आखावी लागणार आहे.

शशिकांत शिंदे यांना कराड उत्तरमधून सर्वाधिक मताधिक्याचे अपेक्षा होती. मात्र, तिथेच त्यांना दगाफटका झाल्याने उदयनराजेंचा विजय सुकर झाला. शशिकांत शिंदे ज्या मतदारसंघावर भिस्त ठेवून होते तेथेच मताधिक्य घटल्याने शशिकांत शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघांमध्ये उदयनराजे भोसले यांना 75460 व आमदार शशिकांत शिंदे यांना 78,403 मते मिळाली. मात्र येथे संजय गाडे यांच्या ट्रंपेटने सहा हजार 685 मध्ये खेचून नेली. शिंदेंना येथे 2943 मतांचे मताधिक्य मिळाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाटण तालुक्यात 60 टक्के तर भाजपला ४० टक्के मते मिळाली. राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकर यांनीही प्रयत्न करत येथून शशिकांत शिंदे यांना आघाडी मिळवून दिली.

पाटणमध्ये पुन्हा चुरशीची चिन्हे
पाटण तालुक्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे देसाई व पाटणकर गटांमध्ये कमालीची रस्सीखेच दिसून आली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनासुद्धा ही बदलती राजकीय समीकरणे लक्षात ठेवून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती ठरवावी लागणार आहे.

कारण आता पाटणमध्ये दोन्ही गटांमधील चुरस वाढण्याची शक्यता या निकालातून मिळाली आहे. तरीही पाटण तालुक्यातून उदयनराजे भोसले यांना मिळालेली 75 हजार मते महत्त्वपूर्ण आहेत. कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण या तीन मतदारसंघांमधील पूर्वीचे मतदान पाहता उदयनराजे भोसले यांच्या विजयामध्ये यावेळी या मतदारसंघांनी मोठी मोलाची भूमिका बजावल्याने उदयनराजे यांचा दिल्लीला जाणारा मार्ग सोपा झाला.