आमदार पवारांमुळे ज्येष्ठाला मिळाले नवजीवन ;हॉस्पिटलचे तीन लाखांचे बिल माफ

विठ्ठलवाडीच्या गवारे कुटुंबाला दिलासा
शिक्रापूर :
विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका 68 वर्षीय ज्येष्ठाची प्रकृती अचानकपणे बिघडल्याने तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी येणारा खर्च त्यांना शक्‍य नसल्याने आमदार अशोक पवार यांनी पुढाकार घेत ज्येष्ठावर उपचार केल्याने ज्येष्ठ नागरिकाच्या आयुष्यात नवचैतन्य मिळाले आहे.

विठ्ठलवाडी येथील शांताराम नारायण गवारे यांना (दि.10) ऑक्‍टोबर रोजी छातीत दुखू लागल्याने त्यांना पुणे येथील एन एम वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान, तेथील डॉक्‍टरांनी तपासणी करीत तातडीची शस्त्रक्रिया करण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. मात्र, यावेळी उपचाराला तब्बल तीन लाख रुपये खर्च येणार होता. परंतु शांताराम गवारे यांनी घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने काय करायचे, हा प्रश्‍न त्यांच्या कुटुंबीयांपुढे होता.

शांताराम यांचे पुतणे कैलास गवारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरुर तालुका सरचिटणीस सुनील गवारे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने आमदार पवार यांच्याशी संपर्क साधत त्यांना सर्व हकीगत सांगितली. त्यावेळी आमदार पवार यांनी हॉस्पिटलशी संपर्क साधत दहा टक्‍के राखीव खाटा सवलत योजनेतून त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश दिले.

पत्र देखील हॉस्पिटल प्रशासनाला पाठवून दिले. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने शांताराम गवारे यांच्यावर उपचार केले. गवारे यांचे तीन लाख रुपये बिल देखील माफ झाले. सध्या गवारे पूर्णपणे बरे झाले असून त्यांना सध्या घरी सोडण्यात आलेले आहे. गवारे कुटुंबीयांनी आमदार पवार हे आमच्यासाठी देवाच्या रूपाने धावून आले असल्याच्या भावना ज्येष्ठ नागरिकाने व्यक्‍त केले.