गेल्या ५ वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे मताधिक्याने माझा विजय

– महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे प्रतिपादन
– २६ मार्च रोजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश
मंचर –
गेल्या ५ वर्षात झालेली विकासकामे आणि जनसंपर्क यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने माझा विजय होणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी मुबई येथे सवांद साधताना सांगितले.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत होती. दरम्यान आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तारीख निश्चित झाली असून येत्या मंगळवार, दि. २६ मार्च रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात उभे राहणार आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिरुरची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. आता महायुतीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर परस्पर सहमतीने शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच स्पष्ट झाले. ते येत्या 26 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थक देखील राष्ट्रवादीत दाखल होतील, असे बोलले जात आहे. शिरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचे आव्हान आहे.

शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? असे बाळबोध प्रश्न आता विचारु नका. राष्ट्रवादीचा उमेदवार शिरुरमधून मोठ्या फरकाने विजय मिळवेल. शिरुर-आंबेगाव येथे पक्ष प्रवेशाची मोठी सभा होईल, असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले. पक्ष प्रवेशाआधी माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलण झालं आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आहे, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

महायुतीचे जागावाटप लवकरच
महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल, असे सुनील तटकरे म्हणाले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवायच. ४५ पेक्षा जास्त खासदार निवडणूक आणण्याचे आमचे उद्दिष्ट्य आहे. असे सुनील तटकरे म्हणाले.