ग्रहणाच्या काळात भाजीपाला सुरीने चिरत गर्भवतीने झुगारल्या विविध अंधश्रद्धा

इस्लामपूर : महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नाने इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यानपिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या. येथील महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती महिला सौ. समृद्धी चंदन जाधव या तरुणीने आज पिढ्यान पिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या अंधश्रद्धा दूर केल्या. ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे फळे कापणे, झाडांची फळे पाने तोडणे, अन्न खाणे,पाणी पिणे,हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली करत ग्रहण कालावधी आनंदात व्यतीत केला. प्रत्यक्ष सौर चष्म्यातून सूर्यग्रहण पाहून धाडसी कृती करत तरुणीने वेगळा आदर्श महाराष्ट्राला घालून दिला.

जाधव कुटुंबाने आपल्या घराच्या अंगणात छोटे खानी कार्यक्रम आयोजित केला. सकाळी सूर्यग्रहणाच्या वेळेत अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान वेगवेगळ्या शारीरिक हालचाली करत समृद्धी यांनी अनेक वर्षांपासून असणाऱ्या अंधश्रद्धा झुगारून नवा आदर्श तयार केला. समृद्धी या बारावी उत्तीर्ण आहेत. त्यांनी चंदन जाधव या युवकाशी आंतरजातीय विवाह केला आहे. पती स्वतःच्या पायावर उभा असून तो चालक म्हणून कार्यरत आहे. समृद्धी यांच्या सासू सिंधुताई जाधव यांनी तीला प्रोत्साहन दिले.

सौ. समृद्धी जाधव म्हणाल्या, “आज आधुनिक काळात इंटरनेटच्या युगामध्ये अशा अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझे व माझ्या कुटुंबाची जागृती केली. आम्ही हे धाडसी पाऊल टाकले आहे. माझ्या कुटुंबीयांनी मला साथ दिली. सासूबाई श्रीमती सिंधुताई जाधव,चंदन जाधव, दीपक जाधव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी प्रोत्साहन दिले. या उपक्रमात सहभागी झाल्याने मला खूप आनंद वाटला. विज्ञानाच्या काळात हे धाडसी पाऊल उचलायला  नको का ? असा प्रश्न ही यावेळी समृद्धीने केला.

इस्लामपुर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. सीमा पोरवाल म्हणाल्या ,” अंनिसच्या जनजागृतीचा कार्यक्रम पथदर्शी आहे. ग्रहणाच्या कालावधीत गर्भवती महिलेवर व गर्भावर कोणताही परिणाम होत नाही. बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण झालेली असते. गर्भधारणेच्या काळात ग्रहण पाहिल्याने व कोणतीही शारीरिक कृती केल्याने बाळाला इजा होते ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. हे आजच्या उपक्रमातून पुढे येईल.”

प्रा. शामराव पाटील म्हणाले, “अंनिस नेहमीच कृतिशील पाऊल टाकत असते. ग्रहणाबाबत हे प्रबोधन लोकांच्यात मोठी जनजागृती करेल.”

महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले, ” खगोलीय घटना अनुभवल्या पाहिजेत. याबाबत आम्ही नेहमीच कृती कार्यक्रम घेत असतो. सूर्यग्रहणा बाबत आजचा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडणाऱ्या युवतीचे कौतुक करावे इतके थोडे आहे.”

यावेळी प्रा. डॉ अर्जुन पन्हाळे, अरविंद कांबळे, प्रा. राजा माळगी, विनोद मोहिते, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, संपत शिंदे उपस्थित होते.

प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी इस्लामपुरातून सूर्यग्रहणाचे फेसबुकवरून थेट प्रसारण करीत प्रबोधन केले. आणि शास्त्रीय माहिती दिली. आपल्याकडे ग्रहण खंडग्रास पद्धतीने दिसते. ग्रहणाचा सुंदर नजराणा लोकांनी पाहिला. प्रा.पी एस पाटील, अवधूत कांबळे, योगेश कुदळे, प्रा.तृप्ती थोरात यांनी संयोजन केले.

 

Leave a Comment