लोकसभा निवडणुकीदरम्यान आतापर्यंत “इतके’ हजार कोटींची रोकड जप्त

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी केवळ दोन दिवस राहीले आहेत. मतदारांना प्रलोभने दाखवण्याचे आणि धनशक्तीचा वापर करण्याचे प्रकार हाणून पाडण्यासाठी निवडणूक आयोग कसोशिने प्रयत्न करतो आहे. यंदाच्या निवडणुकीत आयोगाने अमली पदार्थ आणि रोकड जप्त करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत रोकड, अमली पदार्थ आणि इतर साम्रगी जप्तीचा आकडा ८८८९ कोटी रूपयांपर्यंत गेला आहे. लवकरच हा आकडा ९ हजार कोटींच्या पुढे जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे. यातील ४५ टक्के जप्ती ही ड्रग्ज आणि नशेच्या इतर पदार्थांची आहे.

यापुढेही अधिक दक्ष राहुन ही जप्तीची कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही वर्षांत गुजरात, पंजाब, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मिझोराम येथे झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांच्या वेळीही जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली होती.

निवडणुकीत पैशाचा होणारा वापर रोखणे हेच आमच्यासमोरचे मोठे आव्हान असणार आहे असे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले होते. दरम्यान, निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षांना मदत केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत १०६ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.