पाकिस्तानवर आर्थिक संकट; परकीय गंगाजळीत मोठी घट, रुपयाचे मूल्य झाले कवडीमोल

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये केवळ पाच अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी असतांनाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला द्यावयाची मदत तेथील राजकीय अस्थिरतेमुळे काही काळ स्थगित केली आहे. त्यामुळे पाकिस्तानी रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत आहे.

गुरुवारी पाकिस्तानी रुपयाचा भाव तब्बल 1.09 टक्‍क्‍यांनी म्हणजे 2 रुपये 5पैशांनी कोसळून 189 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. पाकिस्तान मध्ये या आठवड्यामध्ये प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यापासून म्हणजे 4 मार्च पासून पाकिस्तानी रुपयाचा भाव दहा टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. गेल्या 17 दिवसांपासून रुपयाचा भाव कमी होत आहे. पाकिस्तानच्या स्टेट बॅंकेला सध्याच्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी कसलाही वाह नाही.

कारण मुळातच पाकिस्तानमध्ये परकीय गंगाजळी भयंकर कमी आहे. पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री हाफिझ पाशा यांनी सांगितले की चालू खात्यावरील तूट वाढली आहे. परकीय गंगाजळी कमी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मदत करण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानी रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत आहे. पाकिस्तानला सध्याची कर्जाची परतफेड करण्यासाठी 13 अब्ज डॉलरची गरज असताना पाकिस्तान जवळ केवळ पाच अब्ज डॉलर शिल्लक आहेत.