घरावर ठेवला 150 किलोचा कांदा; कारण आहे खुपच खास

नाशिक – येवला तालुक्यातील धनकवाडी येथील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव आणि अनिल भगवंत जाधव या दोघा भावंडांनी घरावर 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. या घराची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत असून या भागात येणाऱ्यांचे हा कांदा लक्ष वेधून घेत आहे. कांद्याच्या उत्पादनातून मिळालेल्या पैशातून घर बांधले. कांद्यामुळे आर्थिक भरभराट झाली म्हणून घरावर 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली असल्याचे जाधव बंधू सांगतात.

जाधव बंधूंची धनकवडी गावात 30 एकर शेती आहे. हा दुष्काळी भाग असल्याने या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यांनी 15 एकर शेतामध्ये कांद्याचे पीक घेतले होते. सर्व खर्च वजा करता त्यांना 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहिला. या पैशात दोघा भावंडांनी शेतात घर बांधले.

लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर बाजार समितीने नुकतेच कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. कांद्यातून चांगला नफा मिळाल्याने आपल्या देखील बंगल्याच्या छतावर ही कांद्याची प्रतिकृती असावी म्हणून जाधव भावंडांनी हा निर्णय घेतला. कांदा पिकाच्या उत्पादनावर जाधव बंधूंनी भले मोठे घर हे शेतात बांधले आहे. परीश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी 15 एकरामध्ये कांद्याचे पीक घेत 15 लाखचा निव्वळ नफा मिळवला. या कांद्याच्या प्रतिकृतीसाठी त्यांना 18 हजार रुपये खर्च आला.