रोहित पवारांवरील ED कारवाई सूडबुद्धीने; ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचे उपोषण

जामखेड – कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून होत असलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केली जात असल्याचा आरोप करत कर्जत जामखेड मतदार संघातील नागरिकांसह राज्यातील विविध ठिकाणच्या नागरिकांनी मुंबईतील ईडी कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषण केले.

“कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यामागे गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. रोहित यांची बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 12 तास चौकशी केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले होते. कुटुंबातील तरुणाला केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा सामना करावा लागत असल्याने पवार कुटुंबातील सर्व सदस्य रोहित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे.

रोहित पवार यांच्यावर ईडीकडून होत असलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केली जात असल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आजही ईडी कार्यालयाबाहेर दाखल होत रोहित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य ईडी कार्यालयाच्या शेजारीच असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित राहत आहेत. ईडी चौकशीच्या निमित्ताने कर्जत जामखेड मतदार संघासह राज्याच्या विविध ठिकाणचे नागरिकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे. यामध्ये जामखेड तालुक्यातील कुसडगांवचे माजी सरपंच बापूसाहेब कार्ले, नान्नजचे युवा नेते अमर चाऊस, आष्टी येथील माधव साके, महेंद्र रासकर, संतोष भोगल, मनीषा भोसले, कविता म्हेत्रे, तुषार जगताप, आदिसह कार्यकर्ते उपोषणास बसले होते.

साडेआठ तासांच्या ईडी चौकशीनंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

रोहित पवार यांची साडेआठ तास चौकशी –
आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणी आज साडे आठ तास ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर रोहित पवार यांनी उपोषणकर्ते कार्यकर्त्यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. यावेळी रोहित पवार म्हणाले, “देशात आणि महाराष्ट्रात लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, तपास यंत्रणांच्या माध्यमातून जो काही प्रयत्न होतोय त्याला विरोध करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपोषण करत आहेत. त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी उपोषण मागे घ्यावं”, असं रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “मी ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की, राज्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या पदाधिकारी, नागरीक, कार्यकर्त्यांनी लोकशाहीचा आवाज ज्या पद्धतीने दाबला जातोय, तसंच सामान्य माणसांच्या मुद्द्यावर चर्चा केली जात नाही, त्यामुळे सामान्य लोकांच्या वतीने लढत असताना आपल्यावर कारवाई होत असेल, तर ते जिल्ह्यांमध्ये सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लढले, कलेक्टर, तहसीलदारांना भेटले, त्यांनी आंदोलन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जनतेचा आवाज त्यांनी शासनापर्यंत पोहोचवला”, असं रोहित पवार म्हणाले.