‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली  – कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणात आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून आज पुन्हा ईडीने त्यांच्या ठिकाणांची झडती घेतली.

ईडीने ऑक्टोबर मध्येच अमानतुल्ला यांच्यावर छापा टाकला होता. अमानतुल्ला हे दिल्ली विधानसभेत ओखला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या प्रकरणी त्यांच्या तीन कथित साथीदारांना नोव्हेंबरमध्ये अटकही करण्यात आली होती.

ईडीने आरोप केला आहे की खान यांनी दिल्ली वक्फ बोर्डातील कर्मचार्‍यांच्या बेकायदेशीर भरतीतून रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात पैसे घेतले आणि त्यातून त्यातून त्यांनी जागेत गुंतवणूक केली आहे. हे आरोप अमानतुल्ला यांनी फेटाळून लावले आहेत.

आम आदमी पार्टी संपवण्यासाठीच असे प्रकार सुरू असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. आज घालण्यात आलेल्या छाप्यांमध्ये काही संशयास्पद नोंदी आढळून आल्याचे ईडीने म्हटले आहे.