ED Raid : आप खासदार एनडी गुप्तासह केजरीवाल यांच्या खाजगी सचिवाच्या घरावर ईडीचे छापे ; जल बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी कारवाई

ED Raid :  दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार आणि राज्यसभा खासदार एनडी गुप्ता यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. दिल्ली जल बोर्डातील भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने आज सकाळी ही कारवाई केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार आणि आम आदमी पार्टीशी संबंधित इतर लोकांच्या जागेवर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. दिल्लीत जवळपास 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार आणि दिल्ली जल बोर्डाचे माजी सदस्य शलभ कुमार आणि इतर काही नेत्यांच्या ठिकाणांवर ईडीचे छापे टाकण्यात येत आहेत. केंद्रीय एजन्सी दिल्ली जल बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करत आहे. सीबीआय आणि दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या (एसीबी) एफआयआरच्या आधारे ईडी कारवाई करत आहे.

सीबीआयने आरोप आहे की दिल्ली जल बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटरचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करण्यासाठी निविदा काढताना कंपनीचा फायदा करून देण्यासाठी काम केले आहे. दिल्ली जल बोर्डाचे तत्कालीन मुख्य अभियंता जगदीश कुमार अरोरा यांनी मेसर्स एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला कंपनीने आवश्यक निकष पूर्ण केले नसतानाही 38 कोटी रुपयांची निविदा दिली होती. अलीकडेच ईडीने पीएमएलएच्या आरोपावरून जगदीश अरोरा आणि अनिल कुमार अग्रवाल यांना ३१ जानेवारीला अटक केली होती.

एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बनावट कागदपत्रे सादर करून निविदा जिंकल्याचे ईडीच्या तपासातुन समोर आले आहे. मेसर्स एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने अनिल कुमार अग्रवाल यांच्या मालकीच्या मेसर्स इंटिग्रल स्क्रूस लिमिटेड या कंपनीला कामाचे उप-करार दिले. अनिल अग्रवाल यांना टेंडरची रक्कम मिळाल्यावर त्यांनी सुमारे 3 कोटी रुपयांची लाच रक्कम जगदीश कुमार अरोरा यांना रोख आणि बँक खात्यांद्वारे हस्तांतरित केली. यासाठी अरोरा यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. जगदीश कुमार अरोरा यांच्या निकटवर्तीयानेही रोख लाच स्वीकारली. ईडीने यापूर्वी 24 जुलै 2023 आणि 17 नोव्हेंबर 2023 रोजी छापे टाकले होते, त्यानंतर कागदपत्रे आणि पुरावे जप्त करण्यात आले होते.