राणांनी लकडावालाकडून 80 लाख घेतल्याचा तपास ईडीने करावा – छगन भुजबळ

मुंबई – खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर जो आरोप केला आहे, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. पोलीस, ईडी यांनी हा तपास केला पाहीजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पाच लाख रुपयांची जमीन खरेदी केली म्हणून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. आता तर राणा यांनी 80 लाख रुपये युसूफ लकडावालाकडून घेतले आहेत. लकडावालाकडून एवढी मोठी रक्कम का घेतली? कोणाच्यावतीने एवढी रक्कम घेतली? याची चौकशी संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे झाली पाहीजे, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

खासदार नवनीत राणा मागासवर्गीय आहेत, यावर हायकोर्टाने नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या मागासवर्गीय नाहीत असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदविले आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात प्रकरण गेले आहे. त्यामुळे मुळात त्या मागासवर्गीय नाहीत. आता त्या म्हणत आहेत की, आमच्यावर अन्याय झाला. पण दिवसभर त्यांनी काय केले? ते देखील पाहावे. तसेच कोर्टाने जी ऑर्डर दिली, त्यात राणा दाम्पत्याने पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार केली नसल्याचा उल्लेख केला आहे, असे भुजबळ म्हणाले.

तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन देखील त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार वारंवार इंधनाचे दर वाढवत असून राज्यांना जीएसटीचा परतावा देत नाही. 25 रुपयांची वाढ करुन त्यानंतर दोन रुपयांची दर कपात करुन फार मोठी कपात केल्याचा आभास केंद्र सरकारकडून निर्माण केला जातो, अशी टीकाही भुजबळ यांनी केली.

किरीट सोमय्या यांच्यावर जो हल्ला झाला त्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले की, रक्तस्त्राव झालेला नाही असे मेडिकल रिपोर्टमध्ये म्हटले आहे, तर त्यांच्या तोंडावर रक्त कुठून आले? दुसऱ्या दिवशी ते पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यावर बँडेज नव्हते, तिथे जखम नव्हती, हे कसे काय झाले? असे प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केले.