अबाऊट टर्न : चकवा

डिजिटल क्रांतीचं युग आहे. चौथी औद्योगिक क्रांती म्हणून ओळखलं जाणारं हे युग. प्रत्येक शब्दामागं “डिजिटल’ शब्द लागण्याचे हे दिवस. डिजिटल जाहिरातींपासून डिजिटल क्‍लासरूमपर्यंत सर्वत्र याच शब्दाचा बोलबाला. बॅंका वगैरे डिजिटल झाल्याच आहेत. पेमेन्टही डिजिटल झालंय. डिजिटल शेतीसुद्धा काही दिवसांनी शक्‍य होईल, असं सांगणारे सांगतात. 

पाणीपुरवठ्यापासून गॅसच्या पुरवठ्यापर्यंत सर्व यंत्रणा डिजिटली मॉडिफाइड होत चालल्यात. इतका गाजलेला हा शब्द चांगल्याबरोबरच वाईटालाही जाऊन चिकटणं स्वाभाविक होतं. किंबहुना आपल्याकडे वाईटाचा शोध अधिक लवकर लागतो. त्यातूनच सध्या “डिजिटल व्यसनं’ जन्माला आलीत. खरं तर “डिजिटल व्यसन’ किंवा “डिजिटल ड्रग्ज’ हा शब्दच कळायला तसा अवघड. डिजिटल उपकरणांमधून तल्लफ कशी पूर्ण करणार? समजा आम्हाला चहा पिण्याची प्रचंड तल्लफ झालीये (आम्हाला तेवढीच होते) आणि आसपास चहाची टपरी किंवा हॉटेल नाही.

तल्लफ डिजिटली पूर्ण करायची, असं समजा आम्ही ठरवलं तर ते शक्‍य कसं होणार? डिजिटल युगात आपण अज्ञानी आहोत, हा न्यूनगंड आम्हाला पावलोपावली सतावत असतोच. त्यातच डिजिटल व्यसन किंवा डिजिटल ड्रग्ज या शब्दांनी आमच्या अज्ञानाचा कोथळाच बाहेर काढला. परंतु यावेळी न हरता आपण हा काय प्रकार आहे हे समजून घ्यायचंच, असा चंग बांधला आणि “व्यसनानुभवी’ मित्रांकडे चौकशी केली. परंतु हे प्रकरण त्यांच्याही आकलनशक्‍तीच्या बाहेरचं निघालं.

मग थोडा धीर आला. डिजिटल युगात केवळ आपण एकटेच अडाणी नाही याची खात्री पटली. अर्थात हा दिलासा अल्पायुषी ठरला आणि “डिजिटल ड्रग्ज म्हणजे काय रे भाऊ?’ हा प्रश्‍न पाठलाग करतच राहिला. या प्रश्‍नाच्या खोलात गेल्यावर मेंदूला झिणझिण्या आणणारी माहिती मिळाली. मुळात मेंदूला झिणझिण्या आणणं किंवा मेंदूला फसवणं हाच “डिजिटल ड्रग्ज’चा पाया आहे म्हणे! हा प्रकार मानला तर खूप गमतीशीर आणि मानला तर अत्यंत भयावह असा आहे. विशिष्ट संगीताचा वापर करून मेंदूला चकवा द्यायचा आणि त्यायोगे मिळणाऱ्या नशेचा आनंद घ्यायचा, असा हा अघोरी प्रकार आहे.

डिजिटल ड्रग्ज संकल्पनेत हेडफोन्स, मोबाइल आणि इंटरनेट या तीनच गोष्टींची गरज असते. यातून नशा कशी निर्माण होते, हे ऐकून हादरायला झालं. एखादी व्यक्‍ती कानाला हेडफोन लावते आणि “बायनॉरल बिट्‌स’ नावाचा ध्वनी ऐकत राहते. हे संगीतच असतं; परंतु खूपच वेगळं. या प्रक्रियेत दोन कानांना दोन वेगवेगळ्या फ्रीक्‍वन्सीचं संगीत ऐकवलं जातं. उजव्या कानाला ऐकू येणाऱ्या तालाच्या मात्रा आणि डाव्या कानाला ऐकू येणाऱ्या तालाच्या मात्रा भिन्नभिन्न असतात. सुरावटीही दोन्ही कानांना वेगवेगळ्या ऐकू येत राहतात.

ऐकू येणाऱ्या दोन्ही परस्परविरोधी ध्वनींचा अर्थ लावता-लावता मेंदू पुरता “कन्फ्यूज’ होतो. ही अवस्था नशा देणारी असते. कोणतंही द्रव्य किंवा ड्रग न घेता मेंदूला नशा देण्याचा हा अघोरी प्रकार आता सर्वत्र सर्रास सुरू झालाय. तसं पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारच्या संगीतात तल्लीन झाल्यावर एक प्रकारची नशा येतच असते. योगाभ्यास करणाऱ्यांना “योगनिद्रा’ संगीत ठाऊक असतंच. पण मेंदूला मुद्दाम गोंधळात टाकून नशा निर्माण करणं एकंदरीत भयानकच!