अबाऊट टर्न : तोतये

-हिमांशू

बनावट काय-काय असू शकतं आणि कोणकोणत्या मार्गांनी फसवणूक करता येऊ शकते, याचा जर जागतिक अभ्यासक्रम (सध्या करोनामुळे ऑनलाइन) सुरू करायचा झाल्यास शिक्षक भरतीत आपल्याकडची माणसं आघाडीवर असतील.

ताजमहालाची विक्री करणारा माणूससुद्धा इथे आढळून आला. त्यापासून “प्रेरणा’ घेऊन एका हिंदी चित्रपटाचा क्‍लायमॅक्‍स तयार करण्यात आला. फसवणूक प्रकरणात मुलगा जेलमध्ये जात असतानाच त्याचा बाप जेलमधून शिक्षा भोगून बाहेर पडत असतो. बाप मुलाला विचारतो, “”तू आतापर्यंत काय-काय विकलंस?” मुलगा सांगतो, “”कुतुबमिनारापासून ताजमहालापर्यंत सगळं!”आपण खूप मोठा तीर मारल्याच्या आनंदात मुलगा असतानाच बाप सांगतो, “”मी आत्ताच हे जेल विकून बाहेर चाललोय.” तात्पर्य, फसवणुकीच्या बाबतीत आपल्याकडे विक्रमावर विक्रम प्रस्थापित होऊ शकतात.

बनावट कंपन्या सुरू करणं हा तर आपल्याकडे अनेकांच्या हातचा मळ. अशा नावापुरत्या कंपन्यांना “शेल कंपन्या’ म्हणतात आणि त्या माध्यमातून फक्‍त पैशांची फिरवाफिरवी केली जाते. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या नावावर भारतात बनावट कंपनी सुरू करणं म्हणजे कौशल्याचा कळसच! राजेश आणि प्रदीप ही दोन माणसं एखाद्या बॅंकेला 97 लाखांची म्हणजे जवळजवळ एक कोटी रुपयांची टोपी घालू शकतात, हे बॅंकेच्या कडेकोट व्यवस्थेचा अनुभव असणाऱ्या आपल्यासारख्या सामान्य लोकांना पटूच शकणार नाही.

दोन कंपन्यांचे मालक असलेल्या या दोघांनी प्रत्येकी पाच-पाच लोक आपापल्या कंपनीत कर्मचारी म्हणून नेमले. तरीही दोन्ही कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांची बेरीज पाचच! कारण दोन्ही कंपन्यांची पगारपुस्तकं वेगवेगळी असली तरी कर्मचारी तेच होते. इथेच बनावटगिरीला सुरुवात झाली. पाच बनावट माणसं तयार झाली. त्यापाठोपाठ दरमहा दहा जणांच्या बनावट पगार स्लिप तयार होऊ लागल्या. मग या स्लिप बॅंकेला दाखवून त्याआधारे कर्ज घ्यायला सुरुवात झाली. गाडीसाठी कर्ज, घरासाठी कर्ज, व्यक्‍तिगत कर्ज अशा प्रकारे कर्जाचा आकडा वाढत चालला.

सिनेमात ज्याप्रमाणं व्हिलन मेल्यावरच पोलीस येतात, त्याप्रमाणं कर्जाचे हप्ते थकल्यानंतरच बॅंकेला फसवणूक झाल्याचं समजणार, हे उघड होतं. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू झाला आणि बॅंकेला आणखी एक धक्‍का बसला. कारण राजेश आणि प्रदीप या दोन वेगवेगळ्या व्यक्‍ती नसून एकच माणूस होता! परंतु त्या दोघांची वेगवेगळी पॅनकार्ड होती. शिवाय दोन वेगवेगळ्या नावांची दोन आधारकार्डंही या पठ्ठयानं तयार करून घेतली होती. एकाच मोबाइल क्रमांकावर दोन आधारकार्ड आणि दोन पॅनकार्ड त्याला दिली कुणी? धक्‍कादायक आहे खरं; पण जिथं डॉक्‍टरांची बनावट प्रिस्क्रिप्शन्स आणल्याचा आरोप होतो तिथं…

असो, आमचा मुद्दा वेगळाच आहे. आमच्यासारखे लोक बॅंकेकडून कर्ज घेतो तेव्हा प्रचंड काळजी घेणाऱ्या बॅंकेतल्या कर्मचाऱ्यांना हे तोतये ओळखू येत नसतील तर ते (तोतये) खूपच हुशार आहेत असं म्हणावं लागेल. कर्जदाराचे हप्ते थकले म्हणून जामीनदाराचा बॅंक अकाउंट लॉक करणाऱ्या यंत्रणेला बारा माणसं भेटतात आणि अखेर ती सहाच असल्याचं स्पष्ट होतं, ही फॅंटसीच वाटते. पोलिसांचासुद्धा तसाच तर्क आहे आणि म्हणूनच तोतयाला मदत करणारे “इनसाइडर्स’ शोधायला सुरुवात झालीये.

Leave a Comment