विविधा : कृ. पां. कुलकर्णी

-माधव विद्वांस

मराठी भाषा शास्त्रज्ञ व मराठी व्युत्पत्तिकोशकार कृ. पां. कुलकर्णी यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1892 रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झाला. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्‍यातील ओंड हे त्यांचे मूळ गाव. घरच्या गरिबीमुळे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निगडी, फलटण, नाशिक, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाले. 

शिक्षणासाठी गाव सोडल्यावर त्यांना अनेकांनी मदत केली होती. कोल्हापुरात शिष्यवृत्ती मिळाल्याने ते तेथूनच 1911 साली मॅट्रिक्‍युलेशनची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर व फर्गसन महाविद्यालय, पुणे येथे झाले. बी.ए. झाल्यावर लगेच त्यांना पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांना शासकीय शाळेत नोकरी मिळाली व त्यांची धुळे येथे नेमणूक झाली. कालांतराने त्यांची सातारा येथे बदली झाली. सातारच्या वास्तव्यात त्यांनी नोकरी करीत एम.ए.चा अभ्यास केला.

वर्ष 1916 मध्ये पदवी प्राप्त होताच मुंबई येथे जाऊन त्यांनी त्या वेळची शिक्षण खात्यातली बी.टी. पदवी संपादन केली. या वेळी प्र. के. अत्रे व वि. द. घाटे हे मराठी साहित्यिक त्यांचे सहाध्यायी होते. त्यांनी एम.ए., बी. टी. झाल्यावर सुरुवातीस शिक्षक, पुढे अहमदाबाद व मुंबई येथे अनुक्रमे संस्कृतचे व मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांना 1920 च्या सुमारास अहमदाबादच्या गुजरात महाविद्यालयामध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. बारा वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्यावर ते 58व्या वर्षी शासकीय सेवेतून निवृत्त झाले.

1929 साली त्यांची नेमणूक रियासतकार गो. स. सरदेसाई यांचे मदतनीस म्हणून झाल्यावर ते इतिहास संशोधनाकडे वळले.मुंबई येथील एका महाविद्यालयाचे ते काही काळ प्राचार्यही होते. वर्ष 1948-50 या कालावधीमध्ये “मराठी संशोधन मंडळा’चे ते संचालक होते. तसेच “महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळा’चे अध्यक्ष आणि शुद्धलेखन समितीचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
वर्ष 1926 मध्ये इंग्रजीमधून संस्कृत ड्रामा अँड ड्रॅमॅटिस्ट्‌स हे पुस्तकही लिहिले. तसेच वर्ष 1929 मध्ये जी. एफ. म्यूरच्या “द बर्थ अँड ग्रोथ ऑफ रिलिजन’ ह्या ग्रंथाचा अनुवाद “धर्म : उद्‌गम आणि विकास’ ह्या नावाने केला.

राजवाडे मराठी धातुकोश (1937) या ग्रंथाचे संपादन करून त्यास त्यांनी विवेचक प्रस्तावना लिहिली. तसेच पाठचिकित्सा शास्त्रास अनुसरून मुकुंदराजाच्या “विवेकसिंधू’चे संपादन केले. वर्ष 1933 मध्ये भाषाशास्त्राची सामान्यतत्त्वे व मराठीची भाषिक परंपरा यावर प्रकाश टाकणारा “मराठी भाषा : उद्‌गम व विकास’ तसेच वर्ष 1946 मध्ये “मराठी व्युत्पत्तिकोश’ हे प्रमुख ग्रंथ त्यांनी लिहिले.

त्याखेरीज वर्ष 1953 मध्ये, “शब्द : उद्‌गम आणि विकास’ हे ग्रंथ तसेच “मराठी व्याकरण’ हे पुस्तक त्यांच्या पश्‍चात डॉ. ग. मो. पाटील ह्यांनी पूर्ण केले. पेशवे दप्तराचे 45 खंड (1930-34), ऐतिहासिक पत्रव्यवहार (1957) आणि महाराष्ट्रगाथा (1960) ह्या इतिहासाशी संबंधित ग्रंथांचे ते सहसंपादक होते. कृष्णाकाठची माती (1961) हे त्यांचे आत्मचरित्र. वर्ष 1952 मध्ये अमळनेर येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

Leave a Comment