व्यक्‍तिविशेष : गंगूबाई हनगल

– शर्मिला जगताप

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या गायिका गंगूबाई हनगल यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 5 मार्च 1913 रोजी धारवाड येथे तत्कालिन मुंबई प्रांतात झाला. गंगूबाईंच्या आई अंबाबाई या कर्नाटक शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच आपल्या आईकडून त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी, 1924 साली त्यांनी बेळगाव येथे भरलेल्या इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या अधिवेशनात स्वागतगीत गायले.

धारवाड येथे प्रतापलाल व श्‍यामलाल यांच्याकडे लहानपणीच गंगूबाईंनी काही काळ कथ्थक नृत्याचे धडे घेतले, तर हिंदुस्थानी गायकीचे शिक्षण त्यांनी कृष्णाचार्य हुळगूर यांच्याकडे घेतले. 1938 साली सवाई गंधर्व म्हणजे रामचंद्र गणेश कुंदगोळकर या किराणा घराण्याच्या गायकांकडे गंगूबाई यांची दीर्घकाळ संगीत-साधना झाली. तेथे त्यांना गायक भीमसेन जोशी आणि फिरोज दस्तूर यांचीही साथ लाभली. वकील व व्यावसायिक गुरुराज कौलगी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

1932 ते 1935 या काळात ग्रामोफोन कंपनीने त्यांच्या “गांधारी’ या टोपणनावाने काढलेल्या सुमारे 60 ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. रागसंगीत आणि मराठी भावगीते असलेल्या या ध्वनिमुद्रिका रसिकांनी कान भरून ऐकल्या. या गाण्यांत मराठी लेखक आणि कवी मामा वरेरकर यांची “बाळाचा चाळा’ आणि “आईचा छकुला’ ही दोन गाणी गंगूबाईंच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली होती. महाराष्ट्रात त्या काळी ही दोन गाणी प्रत्येक घरात ऐकली जात असत. “कुसुम चाप कां धरी’, “नव रंगी रंगलेला’, “हरिचे गुण गाऊया’, “कशी सदया ना ये माझी दया’, “मना ध्यास लागे’ ही गंगूबाईंची गाजलेली मराठी गाणी.

पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे 200 शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले.

भारत सरकारने 1971 साली पद्मभूषण पुरस्कार व 1999 साली पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्‍टरेट यांचा समावेश आहे. तर नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा गौरव झाला होता. गंगूबाई यांचे वयाच्या 97व्या वर्षी 21 जुलै 2009 रोजी निधन झाले. भारतीय शास्त्रीय संगीताची पताका देशविदेशात पडकावणाऱ्या गंगूबाईंचा आवाज भारतीयांच्या मनात कायम घर करून राहिला.

Leave a Comment