अमृतकण : सूर्योपासना

आजोबा आणि मुलं त्यांची ती सूर्यनारायणाची प्रार्थना, सूर्यनमस्कार घालून झाले आणि मग दमलेली ती मंडळी सोप्यावर येऊन बसली.. त्याचां गप्पांचा विषय ही अर्थातच ही सूर्य उपासना हाच होता. नातवंडांनी आजोबांना विचारले की, “”आजोबा! पण ही अशी सूर्याची उपासना रोज का करायची?” 

त्यावर आजोबांनी सांगितले की सुमा, श्री अरे सूर्य ही तुम्हा-आम्हाला दिसणारी देवता आहे. सूर्याबद्दलची भौगोलिक माहिती म्हणजे सूर्य हा एक ग्रह आहे. तो अत्यंत तेजस्वी आणि स्वयंप्रकाशित आहे. सूर्य हा पृथ्वीपासून किती दूर आहे?, त्याचे प्रकाश किरण आपल्या पृथ्वीपर्यंत खाली यायला किती वेळ लागतो? हे सारं तुम्ही भूगोलात शिकला आहात.

तर सूर्याचे प्रकाशकिरणही जीवाच्या वाढीसाठी किती महत्त्वाचे आहेत. सूर्य प्रकाशात कोणते जीवनसत्त्व आहे. त्याची मानवी शरीरास किती गरज आहे. ते न मिळाल्यास कोणते रोग होतात. सूर्याच्या उष्णतेचे पाण्याची वाफ कशी होते, वाफेचे ढग कसे होतात, त्याच ढगातून पाऊस कसा पडतो, हे जलचक्र कसे कार्य करत असते. हे तुम्ही शास्त्र विषयात अभ्यासलेले आहे. सूर्याबद्दलची ही तुमची माहिती हे विज्ञान आहे. त्या सूर्याला जसं विज्ञानानी ओळखायचं तसंच त्याचे ज्ञानानी महत्त्वही जाणून घ्यायचं असत.

सूर्य ही प्रकाशाची देवता. तो आपल्याला प्रकाश देतो. सूर्यप्रकाश जसा बाहेरच्या जगातला अंधार दूर करतो. तसाच ज्ञानरूपी सूर्य हा आपल्या मनातला नैराश्‍य, दारिद्र, दु:ख, अनारोग्य ह्याचा अंधार दूर करतो. सूर्याच्या बारा नावाच्या आदित्य स्तोत्राचे पठण, त्याला घातलेले सूर्यनमस्कार हा त्याच्या उपासनेचा भाग आहे.कोणतीही देवता त्याची उपासना केली की आपल्याला वरप्रसाद देते.

सूर्य आपल्याला शक्‍ती, बल, सामर्थ्य, ओजस्वता देतो. सूूर्य नमस्कार हा सर्व लहान मोठ्या स्त्री पुरुषाना अत्यंत सहज करता येणारा आणि परिणामकारक फलदायी असा व्यायामाचा प्रकार आहे. आरोग्य हीच खरी संपदा आहे. सूूर्य आपल्याला सातत्य, नियमपालन ह्याची शिकवण देतो आणि म्हणून मुलांनो!

आपल्या संस्कृतीचा आपल्याला हाच सांगावा आहे की- 

आदितस्य नमस्कारन, ये कुर्वन्ति दिने दिने।
जन्मांतर सहस्त्रेषु दारिद्रयम्‌ नोपजायते।।