विशेष : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, स्त्री मुक्तीच्या कैवारी आणि युगस्त्री होत्या, शिवाय थोर सत्यशोधक आणि एक स्त्रीरत्न होत्या. आज त्यांच्या जयंतीदिनानिमित्ताने…

‘सावित्रीबाई या महाराष्ट्रातल्या स्त्री-मुक्ती चळवळीतल्या आद्य प्रणेत्या आहेत’, अशा शब्दांत प्रा. गं. बा. सरदार यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद यांनी 31 जुलै 1890 रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांना पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘आपले सारे जीवन जनतेच्या निःस्वार्थी सेवेसाठी वेचणार्‍या जोतिबांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या निष्काम सेवेची जाणीव ठेवून त्यांना जीवन वेतन मिळत जाईल अशी व्यवस्था कृपा करून महाराजांनी करावी. जोतीबापेक्षाही त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी? आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले व त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. ह्या उभयतांनी लोककार्यात आपले सारे जीवन खर्च केले, अशांना खरे सांगावयाचे म्हणजे आपल्यावर राज्य करणार्‍या सरकारकडून जरूर ती मदत मिळणे आवश्यक आहे.’ यावरून सावित्रीबाईंच्या कार्याची महती अधिक स्पष्ट होते.

पहिल्या भारतीय प्रशिक्षित शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, ता. खंडाळा जि. सातारा येथे झाला. त्यांचा विवाह फाल्गुन वद्य पंचमी, शके 1862 म्हणजे इ.स. 1840 या वर्षी झाला. जोतीरावांनी सावित्रीबाईंना शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. फेरार आणि मिसेस मिचेल यांनी त्यांना प्रशिक्षित केले. सन 1947 या वर्षी सावित्रीबाईंनी ‘अध्यापक ट्रेनिंग’ अभ्यासक्रम पूर्ण केला.

‘महिला सेवा मंडळा’ची स्थापना सावित्रीबाईंनी स्त्रियांची सुधारणा करण्यासाठी सन 1850-51 यावर्षी केली. स्वतः या मंडळाच्या सावित्रीबाई फुले या सचिव होत्या. पुण्याच्या कलेक्टरच्या पत्नी ई. सी. जोन्स या मंडळाच्या अध्यक्षपदी होत्या. जानेवारी 1852 मध्ये मंडळाने मोठ्या प्रमाणात तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत, 13-1-1852 रोजी पुणे कलेक्टर साहेबांच्या पत्नी मिसेन्स जोन्स यांचे अध्यक्षतेखाली सार्वजनिक तिळगूळ समारंभ होणार आहे. तरी सर्व स्त्रियांनी आपल्या लेकी-सुना घेऊन यावे. समारंभ सायंकाळी 5 वाजता आहे. कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या बायका आल्या तरी त्या एकाच आजमावर बसतील. जातीभेद व पक्षपात न करता सर्वांना सारखेच धरून हळदीकुंकू लावण्यात आणि तिळगूळ वाटण्यात येईल. असा उल्लेख असून शेवटी सावित्रीबाई भ्रतार जोतीराव फुले, सेक्रेटरीज, महिला सेवा मंडळ असा उल्लेख आहे. यातून जातिभेद विरहीत जगण्याचा आणि जातीनिर्मूलनाचा संदेश दिला आहे.

विधवा स्त्रियांनी आत्महत्या करू नये आणि बालहत्या होऊ नये म्हणून 1863 यावर्षी जोतीरावांनी स्वतःच्याच घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या गृहाच्या चालिका होत्या, सावित्रीबाई. तरुण विधवांना हे गृह म्हणजे फार मोठा आधार होता. बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या जाहिराती पुणे आणि अन्य धार्मिकस्थळी लावल्या. सन 1884 पर्यंत सुरू असलेल्या या गृहात 35 उच्चवर्णीय विधवांची बाळंतपणे सुखरूप झाली. 1873 यावर्षी काशिबाई नावाच्या स्त्रीचे बाळंतपण करून, तिच्या मुलाचे ‘यशवंत’ असे नामकरण करून फुले दांपत्याने त्यास दत्तक घेतले. हालअपेष्टा सहन करून वैद्यकीय शिक्षण दिले. 4 फेब्रुवारी, 1889 रोजी डॉ. यशवंत यांचा विवाह ग्यानोबा कृष्णाजी ससाणे यांची मुलगी राधा (लक्ष्मी) हिच्याबरोबर सत्यशोधकमध्ये संपन्न झाला. यावेळी जोतीराव फुले पक्षाघाताने आजारी होते. त्यामुळे या विवाहाची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाई फुले यांनी स्वीकारली होती.

सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी झाली; त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनी म्हणजे 25 डिसेंबर, 1873 रोजी पहिला सत्यशोधक पद्धतीचा विवाह सावित्रीबाई यांच्या पुढाकाराने झाला. या विवाहाचा निम्म्यापेक्षा जास्त खर्च (रुपये पंधरा) सावित्रीबाई यांनी केला. विवाह सावित्रीबाईंची मैत्रीण बजूबाई ग्यानोबा निंबाळकर यांची मुलगी राधा हिचा सीताराम बजाजी आल्हाट यांच्याशी संपन्न झाला.
सन 1877 यावर्षी पडलेल्या दुष्काळात सत्यशोधक समाजाच्या वतीने क्षुधानिवारण केंद्र चालविण्यात आले. पुण्यात धनकवडी येथे व्हिक्टोरिया आश्रमात एक हजार पीडितांना दररोज दुष्काळ संपेपर्यंत भाकरी वाटण्यात आल्या. या अन्नछत्रांची जबाबदारी संपूर्णपणे सावित्रीबाई फुले यांच्यावर होती. याच काळात ओतूर येथेही सत्यशोधक समाजाच्या वतीने दुष्काळ निवारण केंद्र उभारण्यात आले होते. या काळात सावित्रीबाई फुले ओतूर येथे वास्तव्यास होत्या. यावेळी ओतूर भेटीवर आलेल्या जिल्हाधिकार्‍यांकडून सावित्रीबाई फुले यांनी 16-17 क्विंटल ज्वारी (जवळपास चार बैलगाड्या धान्य) मदत ओतुर केंद्रात उपलब्ध करून घेतली होती. सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद 1891 मध्ये समर्थपणे सांभाळले. सन 1893 मध्ये सासवड येथे सत्यशोधक समाजाची विसावी परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाई फुले यांनी भूषविले होते. यावेळी त्यांनी प्रतिगामी शक्तींना कडाडून विरोध करून सनातन्यांना चांगलेच ठणकावले होते.

सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेले साहित्य हे केवळ साहित्य नाही तर माणसाला माणूसपण देण्याचा संदेश आहे. त्यात 1) काव्यफुले – कवितासंग्रह 2) जोतिबांचे भाषणे 3) सावित्रीबाईंची जोतिबांस पत्रे 4) बावन्नकशी सुबोध रत्नाकर – कवितासंग्रह 5) मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे, याचा उल्लेख करता येईल. ‘काव्यफुले’मध्ये 41 कविता असून त्या सामाजिक, ऐतिहासिक आणि निसर्गविषयक आहेत. जोतिबांच्या भाषणांचे शब्दांकन चार्लस जोशी यांनी केले आहे. बावन्नकशी सुबोधत्नाकर मध्ये सलग 52 रचना आहेत. जोतीरावांच्या कार्याचे चित्रण आणि देशाचा इतिहास काव्यरूपाने मांडला आहे.

सुमारे पन्नास वर्षांपेक्षा खडतर प्रवास करीत, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन अखंडपणे जोतीरावांना साथ देऊन, केवळ महिलांच्याच नाही तर अखिल मानवजातीला मानवतेचा हक्क देऊन, प्लेगच्या साथीमध्ये शेवटपर्यंत रुग्णांना मदत करून, त्यातच प्लेगच्या बाधेने 10 मार्च, 1897 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि साहित्य आपणास प्रेरणादाई ठरावे. यातून त्यांच्या स्मृती, आठवणी आणि कार्याचा उजाळा व्हावा असे अपेक्षित असले तरी, आपण यातून प्रेरणा घेऊन कृतीकडे जाता येईल काय? याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.