केसनंद येथे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे पाटील यांची मागणी

वाघोली – पुणे शहरालगतच्या गावांमध्ये केसनंद गावाचा समावेश होत असून या गावची लोकसंख्या जवळपास 40 हजार च्या वर गेली असून लोकसंख्येच्या प्रमाणानुसार या गावासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज असून जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त लस केसनंद व परिसरातील गावांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केसनंद ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद हरगुडे पाटील यांनी केली आहे.

याबाबत प्रमोद हरगुडे पाटील यांनी सांगितले की केसनंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मांजरी, कोलवडी, साष्टे, आव्हाळवाडी, आदी भागातील उपकेंद्रे जोडली असून या सर्व भागातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र म्हणून केसनंद  चे लसीकरण केंद्र ओळखले जात असून आठवड्यातून दोनच दिवस या ठिकाणी 40 ते 50 लस उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

वाढत्या लोकसंख्येचा विचार करून व परिसरातील लसीकरण प्रभावीपणे होण्यासाठी या लस अतिशय कमी पडत असून जिल्हा प्रशासनाने तातडीने या भागातील नागरिकांचा विचार करून लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे प्रमोद हरगुडे पाटील यांनी सांगितले आहे. केसनंद ग्रामपंचायतीच्या  व ग्रामस्थांच्या वतीने नागरिकांसाठी जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मात्र प्रशासन या मागणीचा विचार करताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात  ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करून नागरिकांच्या समस्येला वाचा फोडली जाईल असा इशारा देखील ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे यांनी प्रशासनाला दिला आहे.

केसनंद येथे लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी होत असल्याने आजही रात्री-अपरात्री नोंदणी करून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात नागरिक  गर्दी करताना दिसत असून हे चित्र तातडीने बदलण्यासाठी जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्याची मागणी हरगुडे यांनी केली आहे.