गर्दी टाळण्याचे प्रयत्न…पीएमपीच्या आणखी 100 बसेस धावणार

पुणे  – करोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) आणखी 100 बसेस धावणार आहेत. सोमवारपासून बसेसची संख्या वाढवण्यात येणार आहे.

 

लॉकडाऊननंतर दि.3 सप्टेंबरपासून प्रवासी बससेवेला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात शहरातील 190 मार्गांवर सुमारे 400 बसेस सोडण्यात येत होत्या. कालांतराने प्रवाशांची संख्या वाढल्याने बसेसची संख्या देखील वाढविण्यात आली असून, सध्या सुमारे हजाराच्या आसपास बसेस धावत आहे.

 

परंतु, अद्यापही अनेक मार्गांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने करोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढत आहे.

 

प्रवाशांची वाढती गर्दी आणि करोनाचा प्रादुर्भाव यामुळे बसेसच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. यामुळे बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकणार आहे. सोमवारपासून शहरातील विविध मार्गांवर जादा शंभर बसेस सोडण्याबाबत नियोजन करण्यात आल्याचे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले.

Leave a Comment