शालेय पोषण आहारात आता अंडी अन्‌ केळीही; पूरक आहार मिळणार

पुणे – केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पुरक पौष्टिक पदार्थ देण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना अंडी, केळी मिळणार आहेत. यातुन विद्यार्थ्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होणार आहे.

राज्यातील 86 हजार 500 शाळांमधील 1 कोटी 3 लाख विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ मिळवून दिला जातो. केंद्र शासनाकडून सततच्या येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक व 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तर इयत्ता दहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते.

यात तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ दिला जातो. दरम्यान केंद्र शासनाने विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहेत. पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना खिचडी, वरणभात, उसळभात, मटकी भात यास्वरुपात आहार उपलब्ध करुन दिला जातो. या आहारासोबतच आता अन्य पूरक आहार देण्यास राज्य शासनाकडून मंजूरी मिळालेली आहे.

सर्व पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी, केळी देण्यात येणार आहे. एका अंड्यासाठी पाच रुपये इतका दरही निर्धारित करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समिती मार्फत तर नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठतून अंडी खरेदी करुन आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या दिवशी विद्यार्थ्यांना उकडलेले अंडे किंवा अंडा पुलाव, अंडा बिर्याणी उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. शाकाहारी विद्यार्थ्यांना केळी किंवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे