आठ न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीशपदी बढती

नवी दिल्लीे – देशातील हायकोर्टाच्या आठ न्यायाधीशांना एकाच दिवशी मुख्य न्यायाधीशपदी बढती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने घेतला आहे. सरन्यायाधीश एन. व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन जणांच्या कॉलेजियमने आज हा निर्णय घेतला. या निर्णयाची शिफारस केंद्र सरकारला लवकरच पाठवली जाणार असून त्यावर लवकरच शिक्‍कामोर्तब होईल अशी अपेक्षा आहे.

देशातील न्यायाधिशांच्या रिक्त जागा त्वरीत भरण्याचा निर्धार सरन्यायाधीशांनी 4 सप्टेंबर रोजी व्यक्त केला होता. त्यानंतर लगेचच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या आहेत. आता मुख्य न्यायाधीशपदाच्या बढतीचा विषयही हातावेगळा करण्यात आला आहे. हायकोर्टातील 28 न्यायाधीशांच्याही आता बदल्या होणार आहेत. कर्नाटकातील हायकोर्टाचे न्यायाधीश अरविंदकुमार यांची गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.