“मी फडणवीसांचा मालक होतो; ते मी म्हणेल तसे करायचे” राष्ट्रवादीच्या नेत्याने स्पष्टचं सांगितलं

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यात चांगलेच वाक्‌युद्ध रंगले आहे. फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंवर तिखट शब्दांत निशाणा साधला. त्यानंतर खडसेंनी कधीकाळी मी फडणवीसांचा मालक होतो, असे नमूद करत त्यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. या दोघांतील या चिखलफेकीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

जळगावमध्ये मंगळवारी शासन आपल्या दारी कार्यक्रमात त्यांना काळे झेंडे दाखविल्यानंतर, “काळे झेंडे दाखवून त्यांना काय मिळणार आहे? खडसेंना आता नवा मालक मिळाला आहे. त्या नव्या मालकाने सांगितले तसे ते वागत आहेत. त्यांनी भूखंड घोटाळ्यात तोंड काळे केले नसते तर ही काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती,’ असे फडणवीसांनी म्हटले होते.

दुसरीकडे, खडसेंनीही फडणवीसांच्या टिकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. मी बरीच वर्षे देवेंद्र फडणवीसांचा मालक होतो. मी सांगायचो त्याप्रमाणे ते करायचे. कारण मी विरोधी पक्षनेता होतो. पक्षाचा नेता होतो. त्यावेळी मी सांगेल तो कागद फडणवीस आणून द्यायचे. मला ब्रीफ करायचे. पण मी त्यांच्याकडून ही कामे करून घेतली असतील, तर मी त्यांचा मालक झालो का? ही सहकाऱ्याची भूमिका आहे, असे खडसे म्हणाले.

अजित पवार मालक होते का?
देवेंद्रजींनी काही वर्षांपूर्वी अजित पवारांना काही दिवसांसाठी, काही तासांसाठी का होईना आपल्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून घेतले होते. त्यांच्याबरोबर संसार केला होता. मग अजित पवार त्यांचे मालक होते का? मग आता का मालक बदलला. तेव्हा का मालक बदलला. असे बोलणे निव्वळ बालिशपणा आहे. असे बोलण्यापेक्षा त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करावे. कापसाला भाव द्यावा, असेही खडसे यावेळी म्हणाले.