पुणे | घरासाठी वयोवृद्ध आईला मारहाण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – घराचा ताबा मिळावा म्हणून मुलाने पत्नी, सासू आणि मेव्हण्यासह आईला दमदाटी करत डोक्यात प्लॅस्टिकची खूर्ची घातली. तसेच, सुनेने केस ओढून मारहाण केली. ही धक्कादायक घटना जनवाडी परिसरात घडली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात मुलगा, सून, मुलाची सासू आणि मेव्हण्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ५५ वर्षीय महिलेला दोन मुले आहेत. ती जनवाडी येथील अरुण कदम चौकाजवळ रहाते. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी सांगितले की, तक्रारदार आणि तिचा मुलगा यांच्यात मालमत्तेचा वाद आहे. पतीच्या निधनानंतर पीडित महिला जनवाडी येथे राहते.

मोठा मुलगा (वय ३०) व त्याची पत्नी (वय २६) पाषाण येथील निम्हण माला येथील नक्षत्र सोसायटीत राहतात, तर त्याचे सासरचे हडपसर येथे राहतात. शुक्रवारी मुलगा, त्याची पत्नी, भावजय आणि सासूसह पीडितेच्या घरी आले. सुरुवातीला संवाद चांगला चालला होता. पण, नंतर पीडिता त्यांच्यासाठी जेवण बनवत होती.

तेव्हा त्यांनी तिला आम्हाला घरात राहण्यासाठी केव्हा देणार? अशी विचारणा सुरू केली, त्यावर पीडितेने उत्तर दिले की ,माझ्या मृत्यूनंतर घर तुमच्या मालकीचे आहे, तोपर्यंत मी सदनिकेची मालक आहे, तोपर्यंत तुम्ही घराचा ताबा घेऊ शकत नाही. मग आम्ही कुठे रहायचे ? अशी विचारणा करत मुलाने आणि सुनेने वाद घातला. यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला, पिडीतेकडे घराच्या चाव्या मागितल्या मात्र तीने नकार दिला.

यानंतर चौघांनी तिला कोपऱ्यात ढकलले आणि घर सोडण्यास सांगितले. सुनेने पिडीतेचे केस ओढून मारहाण केली. नंतर मुलाने प्लॅस्टिकची खुर्ची उचलून तिच्या डोक्यात घातली. यात तिच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली आहे, त्यांनी तिला शिवीगाळही केली.