कवठेच्या पृथ्वीराज चव्हाण यांची शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवड

इंडियन सोसायटी फॉर शिप, गोट फार्मिंग अँड युटिलायझेशन संस्था निवडणूक

वाई – अविकानगर (राजस्थान) मधील इंडियन सोसायटी फॉर शिप, गोट फार्मिंग अँड युटिलायझेशन या संस्थेच्या कार्यकारी समितीवर कवठे (ता. वाई) येथील सुंबरान गोट फार्मचे पृथ्वीराज दिलीप चव्हाण यांची निवड करण्यात आली.

संस्थेची निवडणूक प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली. संपूर्ण भारतातून ५ विभागांमधून १० संचालकांसाठी ही निवडणूक झाली. ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आजपर्यंत या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर शास्त्रज्ञ, संशोधक अशा व्यक्तींची निवड केली जात होती. यावेळी प्रथमच शेतकरी प्रतिनिधी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची निवड झाली आहे. ही निवड ३ वर्षांसाठी असेल. या संस्थेमार्फत प्रकाशित होणाऱ्या संशोधन प्रबंधास अनन्यसाधारण महत्त्व असते.

शास्त्रज्ञांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी इंडियन सोसायटी फॉर शिप, गोट फार्मिंग अँड युटिलायझेशन ही संस्था विशेषतः कार्य करते. संस्थेमार्फत विविध राज्यांतील संशोधक, शास्त्रज्ञ आणि शेळी-मेंढी पालक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक मेळावे आयोजित करण्यात येतात. अविकानगर येथील सीआयआरजी मगदूम यांच्या संकल्पनेतून १९८२ मध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे.