दस्तनोंदणी करतानाचा वीज मीटरही नावावर

पुणे -जुनी सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी किंवा बिल देखील स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना उपलब्ध झाली आहे. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे. जुनी मालमत्ता खरेदीदारांनी दस्तनोंदणीपूर्वी “पब्लिक डेटा एन्ट्री’ करताना वीजबिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडल्यास वीजबिल नावावर करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

यापूर्वी जुने घर किंवा दुकानाची खरेदी केल्यानंतर वीजजोडणी किंवा बिलावरील नाव बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे तसेच ओळखपत्र, इंडेक्‍स दोन व इतर कागदपत्रे अपलोड करण्याची स्वतंत्र प्रक्रिया करावी लागत होती. तथापि दस्तनोंदणीच्या वेळीच वीजबिल नावावर करून घेण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे वीजग्राहकांचा मोठा वेळ वाचणार आहे, असे महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी म्हटले आहे.

एकाच नावाने मालमत्तेची खरेदी झाली असल्यास अर्जदाराने कोणतेही दस्ताऐवज अपलोड करण्याची गरज यापुढे राहणार नाही. तर एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे खरेदी असल्यास ज्या व्यक्तीच्या नावे वीजजोडणी करायची त्यासाठीची संमती व ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात येईल.

अशी आहे प्रक्रिया

नोंदणी व मुद्रांक विभागाने मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी पब्लिक डेटा एन्ट्री हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. जुन्या घराची किंवा दुकानाच्या दस्तनोंदणीपूर्वी पब्लिक डेटा एन्ट्रीमध्ये माहिती भरताना वीजजोडणी किंवा बिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडणे आवश्‍यक आहे. दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त अर्जानुसार महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने वीजबिलावरील नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू होईल.

याबाबत 60 दिवसांच्या आत संबंधित मालमत्ता खरेदीदारास एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. प्रक्रिया शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी वेबलिंक पाठविण्यात येत आहे. यासोबतच प्रक्रिया शुल्काचे इनव्हॉइस महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व मोबाइल ऍपवर उपलब्ध आहे.