पाकिस्तानातील अकरा अपहृत पोलिसांची सुटका

लाहोर – पाकिस्तानातील तेहरिक ई लबाईक या इस्लामिक कट्टरपंथीयांच्या संघटनेने लाहोर शहरातील हिंसक निदर्शनांच्यावेळी तेथील अकरा पोलीस जवानांचे अपहरण केले होते; पण आता त्यांची आज सुटका करण्यात आली आहे.

रविवारी एका पोलीस ठाण्यावर हल्ला करून या संघटनेच्या समर्थकांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच पळवून नेले होते. त्यामुळे प्रशासन हादरले होते. त्यांनी अपहरणकर्त्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेनंतर या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पाकिस्तानातील फ्रान्सच्या दूताला हाकलून द्या, या मागणीसाठी ही निदर्शने तेथे गेले काही दिवस सुरू आहेत.

गेल्या सोमवारपासून सुरू असलेल्या या निदर्शनांच्यावेळी संघटनेच्या समर्थकांनी एकूण 192 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. त्यातील 191 ठिकाणच्या निदर्शकांना पांगविण्यात पोलिसांना यश आले असले तरी लाहोरमधील हे धरणे आंदोलन अजून सुरू आहे.

त्या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर संघटनेच्या प्रमुखांनी निदर्शकांना पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला. या हल्ल्याच्यावेळी या पोलीस कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले होते.

Leave a Comment