इंग्लंडची एलिझाबेथ घेतेय मराठीचे धडे

भारती विद्यापीठाच्या प्राथमिक शाळेत घेतला प्रवेश

आंबेगाव बुद्रुक – इंग्लंडमध्ये गेली 70 वर्ष स्थायिक असलेल्या गुल्हा कुटुंबातील ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या सहा वर्षाच्या एलिझाबेथ गुल्हा हिने भारती विद्यापीठ प्राथमिक शाळेत (मराठी माध्यम) प्रवेश घेतला आहे. देशातील पालकांना विचार करावयास लावणारी गोष्ट आहे.

सद्यस्थितीत हजारो पालक लाखो रुपये फी भरून इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे उंबरे झिजवत असताना इंग्लंडमधील गुल्हा कुटुंबाने मराठी पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे, अशी भावना शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन धावणे यांनी व्यक्त करीत एलिझाबेथ हिचे शाळेत स्वागत केले.

भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाचे संचालक एम. डी. कदम याबाबत म्हणाले की, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभाग नेहमीच गुणवत्तापूर्ण दर्जेदार व नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी अग्रेसर असते. जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकासारख्या देशात भारती विद्यापीठाच्या माध्यमातून दोन हजार विद्यार्थ्यांना भाषा विषयाचे शिक्षण दिले जाते.

उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थी नेहमी भारती विद्यापीठास प्राधान्य देतात. सदर मुलीचा प्रवेश हा आमच्या शाळेसाठी अभिमानास्पद आहे. तर, मराठी संस्कृती व भाषा तसेच मराठी शाळेत जे संस्कार होतात ते महत्वाचे आहे. बाहेरील देशात राहून आपल्या मातृभुमीचे तसेच मराठी संस्कृतीचे संस्कार होणार नाहीत, याची जाणीव आम्हाला होती.

इंग्रजी भाषा वाईट आहे असे मुळीच नाही परंतु, आदर्श संस्कारी नागरिक घडवण्यासाठी व महाराष्ट्राची संस्कृती मुलीस माहीत व्हावी यासाठी प्रवेश पुण्यातील भारती विद्यापीठ शाळेत मुलीला प्रवेश घेतल्याचे एलिझाबेथच्या आई चित्रा गुल्हाने यांनी सांगितले.

Leave a Comment