राज्यात 2020 मध्ये 1 लाख 99 हजार बेरोजगारांना रोजगार

मुंबई : कोरोना संकटकाळात निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. याद्वारे राज्यात फक्त डिसेंबर महिन्यात 34 हजार 763 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, तर जानेवारी ते डिसेंबर 2020 या संपूर्ण एका वर्षाच्या कालावधीत 1 लाख 99 हजार 486 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात कौशल्य विकास विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशी माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनच्या काळात डिसेंबरअखेरपर्यंत 1 लाख 67  हजार 71 बेरोजगारांना रोजगार मिळाला.

मंत्री मलिक म्हणाले, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने महास्वयंम  हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.

डिसेंबरमध्ये 34 हजार 763 बेरोजगारांना रोजगार

माहे डिसेंबरमध्ये विभागाकडे 89 हजार 328 इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात 12 हजार 680, नाशिक विभागात 22 हजार 844, पुणे विभागात 20 हजार 945, औरंगाबाद विभागात 16 हजार 530, अमरावती विभागात 8 हजार 666 तर नागपूर विभागात 7  हजार 663 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे डिसेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 34 हजार 763 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात 902, नाशिक विभागात 14 हजार 920, पुणे विभागात 6 हजार 826, औरंगाबाद विभागात 8 हजार 145, अमरावती विभागात 3 हजार 928 तर नागपूर विभागात 42 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

महारोजगार मेळाव्यास मोठे यश….

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये 12 ते 20 डिसेंबर 2020 दरम्यान झालेल्या ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास मोठे यश मिळाले. यामध्ये राज्याच्या विविध भागातून 497 उद्योगांनी त्यांच्याकडील 86 हजार 435 रिक्तपदे या मेळाव्यातून भरण्यासाठी खुली केली. या पदांसाठी 1 लाख 60 हजार 827 बेरोजगार उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी 5 हजार 281 उमेदवारांना आतापर्यंत विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असून उर्वरिक्त रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती मंत्री  मलिक यांनी दिली.

रोजगाराची ही चळवळ यापुढील काळातही सुरुच राहणार आहे. यासाठी नोकरीइच्छुक तरुणांनी महास्वयंम या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी. व्हॉटस्ॲप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतात. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

Leave a Comment