INDW vs ENGW 3rd T20 : हेदर नाइटचे अर्धशतक; भारतासमोर 127 धावांचे लक्ष्य…

मुंबई : भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मुंबईतील वानखेडे येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या महिला संघाने सामन्यात 20 षटकांत सर्वबाद 126 धावा केल्या असून भारतासमोर 127 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

इंग्लंडकडून कर्णधार हीदर नाइटने 42 चेंडूत 52 धावांचे योगदान दिले. एमी जोन्स 25 धावा करून बाद झाली. अॅलिस कॅप्सीने सात धावा, सोफी एक्लेस्टनने दोन धावा, बेस हीथने एक धावा केल्या. चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. चार्ली डीन 16 धावा करून नाबाद राहिली.

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या भारतीय संघाकडून सायका इशाक आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी तीन तर रेणुका सिंग आणि अमनजोत कौर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

गेल्या दोन सामन्यात टीम इंडिया पराभूत…

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही टी-20 मालिका पूर्णपणे एकतर्फी झाली आहे. वानखेडेवर 6 डिसेंबर रोजी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 197 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 159 धावा करता आल्या.

त्याच वेळी, 9 डिसेंबर रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्ये, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना 16.2 षटकात 80 धावांवर मर्यादित होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने 11.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले.