ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलियाचा त्रिपक्षीय गट स्थापन

लंडन, वॉशिंग्टन – ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेने मिळून “ऑकस’ नावाचा संरक्षण गट स्थापन केला आहे. भारतीय प्रशांत क्षेत्रातील आपापल्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी हा गट कार्यरत असणार आहे. या गटांतर्गत परस्परांना संरक्षण सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रशांत क्षेत्रात समुद्रावर चीनचा प्रभाव रोखण्यासाठी या गटाचा प्रथम कार्यक्रमांतर्गत ब्रिटन आणि अमेरिकेच्या सहकार्याने ऑस्ट्रेलिया आण्विक पाणबुडी विकसित करणार आहे.

“ऑकस’ हा गट तिन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांद्वारे आभासी पद्धतीने आयोजित एका बैठकीत स्थापन करण्यात आला. या तिन्ही देशानंनी तंत्रज्ञानाचे सहकार्य आणि संयुक्तपणे संरक्षण विकास कार्यक्रम राबवणे, सुरक्षा आणि संरक्षण-संबंधित विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक तळ आणि पुरवठा साखळी यांचे सखोल एकत्रीकरण करण्याचे मान्य केले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बरीस जॉन्सन, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आभासी पद्धतीने या बैठकीत या गटाच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब केले आहे. पुढील 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये “ऑकस’ गटाच्या माध्यमातून भारतीय 0 प्रशांत क्षेत्रात सामर्थ्य समतोल साधण्यासाठी भागीदारी आणि सहकार्यावर भर दिला जाणार आहे, असे या तिन्ही नेत्यांनी संयुक्त पणे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.