“खासदार नसलो तरी कोट्यवधींची विकासकामे मार्गी”- शिवाजीराव आढळराव पाटील

 शिरूर मतदारसंघात 2 कोटी 45 लाख रुपयांची कामे सुरू
मंचर –
एखाद्या गावात कुठल्या कामाची जास्त गरज आहे, याची चाचपणी गावभेट दौऱ्यातून होते, त्यामुळेच मी गेली 19 वर्षे शिरूर लोकसभा मतदारसंघात नेहमी गावांना भेटी देत असतो. खासदार नसलो तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यात यश आल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी केले.

माजी खासदार आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्‍यातील कळंब, रांजणी गटातील एकलहरे, कळंब, लौकी, चांडोली बुद्रुक, थोरांदळे, वळती, भागडी या गावांना भेटी देऊन सुमारे 2 कोटी 45 लाख रुपये रकमेच्या विकासकामांचा शुभारंभ केला. या दरम्यान कळंब येथे बांधण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहाचे त्यांनी उद्‌घाटन केले.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले, गावांतील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन नागरिकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा कशा निर्माण होतील, यासाठी माझे शासन स्तरांवर प्रयत्न सुरू असतात. येथील लोकांच्या प्रेमामुळेच मी गेल्या चार वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युती शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून गावोगावचा विकास करू शकल्याचे प्रतिपादन आढळराव पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी युवासेना विस्तारक सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख प्रवीण थोरात, शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख संतोष डोके, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संजय चासकर शशिकांत बाणखेले, वासुदेव भालेराव, बारकू बेनके, नितीन भालेराव, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक किसनराव उंडे, भागडीचे सरपंच पोपटराव गवारी, एकलहरे सरपंच राणी खैरे, लौकी सरपंच एकता थोरात, भागडीचे सरपंच गोपाळ गवारी, माजी सरपंच प्रीती थोरात, उपसरपंच तुषार थोरात, आनसु शिंदे, शिवाजी लोंढे, बाजीराव अजाब, सूर्यकांत थोरात यांसह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

कुटुंबीयांचे सांत्वन
कळंबच्या सरपंच उषा कानडे यांच्या सासूबाईंचे निधन झाले आहे, तसेच वळती गांजवेवाडी येथील तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे, या दोघांच्याही घरी भेट देऊन यावेळी आढळराव पाटील यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.