नरेंद्र मोदी यांच्‍याकडे कागदपत्रे असूनही कारवाई नाही, काळ्या पैशांबाबत तोडपाणी झाले – पृथ्वीराज चव्हाण

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे काळ्या पैशांबाबतची माहिती आहे आणि याबाबतची सर्व कागदपत्रे असताना कारवाई झालेली नाही, यात तोडपाणी झालेली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्‍येष्ठ नेते पृथ्वीराज चव्‍हाण यांनी मोदी सरकारवर केली. काँग्रेस भवन येथे झालेल्‍या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्‍हाण यांनी मोदी यांच्‍यावर निशाला साधला.

या वेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार रमेश बागवे, दीप्ती चवधरी, अॅड. अभय छाजेड, कमल व्‍यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड व गोपाळ जोशी आदी उपस्थित होते.

मोदी सरकारने निवडणूक रोख्यांच्‍या माध्यमातून जगातील सर्वांत मोठा घोटाळा केला आहे, अशी टीका करून पृथ्वीराज चव्‍हाण म्‍हणाले, मोदींच्‍या काळात अर्थव्यवस्थेचा विकास मंदावला आहे. ते मान्य करत नाहीत. ते पाठ थोपटून घेतात. देशावर 206 लाख कोटींचे कर्ज आहे. आर्थिक, नैतिक भ्रष्टाचार सुरू आहे.

मोदींनी २०१४, २०१९ ची आश्वासन पूर्ण केली नाहीत. त्यांनी देशाला फसवले म्‍हणून माफी मागितली पाहिजे. नरेंद्र मोदींनी ऑपरेशन कमळ केले. आमदारांची- खासदारांची खरेदी- विक्री केली. आमदार त्यांच्यासोबत गेले; पण मतदार गेले नाहीत. नरेंद्र मोदी हुकूमशाहीच्या दिशेने जात आहेत. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव होणे गरजेचे आहे, असेही चव्हाण म्‍हणाले.

मोदी सरकारला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ३१ टक्‍के मते मिळाली, तर २०१९ मध्ये ३७ टक्‍के मते मिळाली. पुलवामा हल्ल्याच्‍या घटनेमुळे मतांची टक्‍केवारी वाढली. या लोकसभेला मोदी सरकारला ३० टक्‍के मते पडणार आहेत. यावरून अजूनही मोदींच्‍या विरोधात ७० टक्‍के मते आहेत, तसेच यंदा इंडिया आघाडीमुळे लोकसभेच्‍या जागा वाढणार आहेत. मात्र, भाजप मतांच्या विभाजनासाठी वंचितसारखा प्रयोग करीत आहे, अशीही टीका चव्हाण यांनी केली.

विशाल पाटील अर्ज मागे घेतील

सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे नक्कीच आग्रही होते. त्यांनी वरिष्ठांकडे तशी मागणीसुद्धा केली होती; पण ते पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करतील. विशाल पाटील अर्ज मागे घेतील, ही खात्री आहे. तसेच प्रत्येक काँग्रेस नेत्याचे कर्तव्य आहे काही नाराजी असेल ते दूर करणे. बरीच चर्चा झाली आहे. विशाल पाटील पक्षाच्या हिताचा निर्णय घेतील, असा विश्वास पृथ्वीराज चव्‍हाण यांनी व्‍यक्‍त केला.

मोदींचा दांभिकपणा उघड

मागच्‍या निवडणुकीत नांदेडच्‍या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्‍हाण यांच्‍यावर कडाडून टीका केली होती. आता अशोक चव्‍हाण भाजपमध्ये गेल्‍यानंतर त्‍यांची प्रतिमा स्‍वच्‍छ झाली. राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळ्याप्रकरणी ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. ते कसे काय भ्रष्टाचारमुक्‍त झाले. यावरूनच मोंदीचा दांभिकपणा व खोटेपणा स्‍पष्टपणे दिसून येतो, असा आरोपही पृथ्वीराज चव्‍हाण यांनी केला.