पुणे जिल्हा | दर 14 मिनिटाला एका महिलेचा कॅन्सरमुळे मृत्यू

जुन्नर, (वार्ताहर) – आज देशात 28 महिलांच्या मागे एक महिला स्तनाच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाचा कॅन्सर होतो. तर दर 14 मिनिटाला एका महिलेचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो. दिवसेंदिवस कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे प्रतिपादन जुन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनानिमित्त जुन्नर येथे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मशीनचे लोकार्पण व तपासणी शिबिरांचे आयोजन डिसेंट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते, त्यावेळी डॉ. गुंजाळ बोलत होत्या. महिलांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी डिसेंट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध निर्यातदार लक्ष्मण मारुती भुजबळ यांनी आपली आई स्व. शकुंतला मारुती भुजबळ यांच्या स्मरणार्थ महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर तपासणीसाठी आवश्यक असणारे आठ लाख रुपयांचे ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीन फाउंडेशनला भेट दिले.

तसेच फाउंडेशनच्या वतीने पुढील काळात जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी शिबिरांचे आयोजन करून महिलांची ब्रेस्ट कॅन्सरची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली.

याप्रसंगी अहमदनगरच्या कॅन्सर सर्जन डॉ. तेजश्री जुनागडे, एसबीआय पुणेच्या उपप्रबंधक ऐश्‍वर्या भोसले, ललिता लक्ष्मण भुजबळ, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, आर. ओ. रॉय, प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसारफ,

स्नेहल बाळसारफ, डॉ. अमेय डोके, डॉ संतोष सहाणे, डॉ. अजित वलवणकर, डॉ. मनोज काचळे, डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र बिडवई, उपाध्यक्ष योगेश धर्मे, सचिव फकीर आतार, आदिनाथ चव्हाण, संतोष यादव, जयवंत डोके, पांडुरंग तोडकर आदी उपस्थित होते.