अबाऊट टर्न : तीनशे शब्द

निवडणुकीच्या ऐन धामधुमीत तीनशे हा आकडा भलताच धुमाकूळ घालून गेला. कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला मिळू शकणार्‍या जागांचा हा अंदाज नव्हे. ही आहे शब्दसंख्या… एका निबंधाची. लहानपणी आपण असंख्य विषयांवर निबंध लिहिले; परंतु ‘अपघात’ या विषयावर परीक्षेत निबंध आल्याचं काही स्मरणात नाही. 

बालमनावर आघात होऊ नये, म्हणून असे विषय शालेय निबंधात टाळले जात असावेत. परंतु ‘निबंध’ हा विषय आता श्रीमंत-गरीब भेदापर्यंत पोहोचलाय. श्रीमंतांना मिळणार्‍या स्पेशल ट्रीटमेन्टचा ‘आयकॉन’ ठरलाय. निबंध लिहून गुण मिळतात, एवढीच मर्यादित माहिती असलेल्यांना, निबंध लिहून पापक्षालन होतं, ही माहिती धक्कादायक असल्यामुळे निबंधाविषयी गांभीर्याने विचार करून अनुभवाचे तीनशे शब्द लिहिण्याचा हा प्रयत्न-

शाळेत प्रवेश घेतानाच ठरलं होतं, कमी मार्क पडून द्यायचे नाहीत. पहिल्या दहात नंबर आला तर गुड, पहिल्या तीनात आला तर बेटर आणि पहिलाच आला तर बेस्ट, असं समीकरण होतं. जास्त अभ्यास कशासाठी, तर जास्त मार्क मिळावेत म्हणून. जास्त मार्क कशासाठी, तर स्पर्धेत पुढे राहण्यासाठी. पुढे कशासाठी राहायचं, तर संधी मिळवण्यासाठी. संधी का मिळवायची, तर अर्थातच पैसे मिळवण्यासाठी. पैसे का मिळवायचे, तर अर्थातच समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी..!(प्रतिष्ठा का मिळवायची, तर अडचणीच्या काळात स्पेशल रसद मिळवण्यासाठी… ही ताजी माहिती!)

थोडक्यात, पैशासोबत प्रतिष्ठा आपोआप येते किंबहुना पैसे नसतील तर कुणी ढुंकून पाहत नाही, हे ‘व्यावहारिक’ ज्ञान शालेय शिक्षणासोबतच मिळालं. ‘मित्र पुढे निघून जातील आणि तू मागे राहशील,’ या भीतीचा गोळा पोटात वाढत गेला. पुढे यथावकाश योग्यतेनुसार रोजगार मिळाला आणि चरितार्थ वगैरे सुरू झाला. जोडीदाराचा शोध घेताना ‘अपेक्षा’ हा शब्द व्यक्तीपेक्षा मोठा असतो, हे समजलं. अपेक्षाही सामान्यतः आर्थिक स्वरूपाच्याच असतात. ‘पॅकेज’ भरघोस असेल तर भविष्यातल्या संभाव्य ले-ऑङ्गचा कुणीच विचार करत नाही, हेहीकळून चुकलं.

पुढेही अशा अनेक उपयुक्त गोष्टी कळून चुकल्या किंवा चुकून कळल्या. उदाहरणार्थ, ज्या गाडीला व्हीआयपी नंबर असतो, त्यात बसलेली व्यक्ती ‘महनीय’ असते आणि तिला घाबरायचं असतं. ज्याची कार मोठी असते किंवा चार मित्र जमल्यावर जो प्रचंड खर्च करू शकतो, त्याला जगातील सर्व गोष्टींचं ज्ञान इतर मित्रांपेक्षा अधिक असतं, सबब त्याचंच खरं मानायचं असतं. ज्याची अक्कल पैसे मिळवण्यासाठी उपयोगी पडत नाही, त्याला मत असलं तरी किंमत नसते, म्हणजेच मत नसतं. किंबहुना ज्यातून धनप्राप्ती होत नाही, ती अक्कलच नव्हे.

मूल्यांना उपयुक्तता नसल्यामुळे किंमतही नसते. म्हणून मग किंमत म्हणजेच मूल्य अशी साधीसोपी व्याख्या करून अर्थरेषेला समांतर चालणारी मूल्यव्यवस्था तयार करणं सोयीचं पडतं. किमतीसाठी मूल्यं सोडणार्‍याला ‘अमूल्य’ म्हणून बिलगता येतं. ‘सुसंगती सदा घडो,’ या उक्तीनुसार हा परिसस्पर्श आपल्यालाही परिवर्तनशील (प्रवाहपतीत नव्हे, माइंड इट!) बनवतो. हा सद्विचारच आपल्याला मोठं करतो. मोठं होणं म्हणजे श्रीमंत होणं, हे मनापासून पटलेलं सत्य असून, ते पुढील पिढीत रुजवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करूया… आणि ‘श्रीमंतांना स्पेशल ट्रीटमेन्ट का,’ यावरही भरभरून बोलूया.