पुणे | सिमेंटचे रस्ते कटरने कापूनच खोदा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेच्या समान पाणी योजनेच्या जलवाहिनीसाठी मागील तीन दिवसांपूर्वी गणेश कला क्रीडा मंचाच्या समोरील सिमेंटचा रस्ता पोकलेन द्वारे खोदण्यात आला. या प्रकाराची महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने गंभीर दखल घेत सिमेंटचा रस्ता खोदायचा असल्यास आधी तो कटरने कापण्यात यावा नंतर तो पोकलेनने खोदावा, अशा सूचना करण्यात केल्या आहेत.

सिंहगड रस्त्याच्या मेट्रोच्या कामात अशा प्रकारे कटरद्वारे सिमेंटचे रस्ते कट करून नंतर खोदाई करण्यात आल्याने नंतर रस्ते दुरूस्ती करताना ते व्यवस्थित दुरूस्त होतात. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्वत: पुढाकार घेत याबाबत ठेकेदारांना सूचना केल्या असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

रस्त्याचे होतेय नुकसान…
पोकलेनने सिमेंटचा रस्ता फोडल्यास खोदाईच्या ठिकाणच्या कडा वाकड्या होतात. नंतर रस्ता पूर्ववत करताना नवीन काम आणि जुना रस्ता एकसमान होत नाही, कडांच्या बाजूला मोठे खड्डे राहतात. या खड्डयांमुळे लहान वाहनांना अपघातांचा धोका वाढतो.

तसेच दुरूस्तीचा खर्च वाया जाऊन त्यावर खड्डेही पडतात. त्यामुळे खोदण्या आधी खोदाईचा भाग कटरने कापल्यास दुरूस्ती सोपी होते तसेच रस्ताही एक सलग राहतो. त्यामुळे रस्त्याचे आयुर्मानही कायम राहत असल्याने पालिकेकडून आता शहरात डांबरी रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांच्या कामांंसाठी कटर वापरला जातो.

ठेकेदारांची नकार घंटा ?
महापालिकेकडून समान पाणी योजनेचा आराखडा तयार करताना तसेच कामांचे स्वरूप ठरविताना खर्चात रस्ते खोदाई तसेच नंतर दुरूस्ती याचा समावेश केला आहे. या कामात कटरने रस्ता कट करण्याची कोणतीही तरतूद नाही तर कटरने रस्ता कट करायचा झाल्यास त्याला मोठा खर्च येतो.

त्यामुळे ठेकेदारांकडून कटरच्या खर्चाचे कारण देत नकार देण्यात येत होता. मात्र, पाणी पुरवठा विभागाने कडक भूमिका घेतल्याने अखेर ठेकेदार तयार झाले आहेत.